जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला जामनेर पोलिसांनी अखेर अटक केली. ‘एक कोटी रुपये द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ,’ अशी धमकी गिरीश महाजन यांना देण्यात आली होती. याप्रकरणी जामनेर पोलिसांनी तपास करत दोन दिवसात धमकी देणाऱ्याला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. महाजनांना धमकी देणारी ती व्यक्ती पाचोरा एसटी डेपो येथे वाहक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. जामनेर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात धमकी देणाऱ्याला अटक केली. या आरोपीचे नाव अमोल देशमुख आहे. तो पाचोरा एसटी डेपो येथे वाहक म्हणून कार्यरत आहे. त्याने गिरीश महाजनांना अशी धमकी का दिली याचा पोलीस तपास करत आहेत.