सोलापूर जिल्ह्यात घरगुती गॅसच्या तुटवड्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र जिल्ह्यात गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी घाबरून अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी दररोज सुमारे २० हजार घरगुती गॅस सिलेंडरची मागणी असते आणि त्या प्रमाणात दररोज पुरवठा होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिली. कोलंबिया येथील निवडणूक दौरा पूर्ण करून सोमवारी सकाळी त्यांनी गॅस पुरवठ्याबाबत आढावा बैठक घेतली.
यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, सध्या घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून गॅस एजन्सीसमोर गर्दी करू नये किंवा अतिरिक्त सिलेंडरची मागणी करू नये.
शासनाच्या सूचनेनुसार सध्या व्यावसायिक गॅस पुरवठ्यासाठी नोंदणी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. मात्र मागणीप्रमाणे पुरवठा करण्यास पुरवठा विभाग सक्षम आहे. राज्य शासनाकडून पुढील सूचना मिळाल्यानंतर व्यावसायिक गॅस पुरवठ्यासाठी पुन्हा नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या जिल्ह्यात गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच शहरी भागातील ग्राहकांना २१ दिवसांनंतर तर ग्रामीण भागातील ग्राहकांना ४५ दिवसांनंतर गॅस पुरवठा केला जाणार असून त्यापूर्वी सिलेंडर उपलब्ध होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

