सोलापूर : तंबाखूमुक्त आरोग्यदायी मुले या कार्यक्रमातून भविष्यातील पिढी तंबाखूमुक्त आणि आरोग्यदायी व्हावी या हेतूने शालेय आणि गाव स्तरावर शिक्षण, आरोग्य, सलाम मुंबई फाऊंडेशनच्या माध्यमातून जे कार्य सुरु आहे ते कौतुकास्पद आहे असे जिल्हाधिकारी यांनी गौरउद्गार काढले.
मुले तंबाखूजन्य पदार्था पासून दूर रहावीत आणि त्यांनी आरोग्य सम्पन्न जीवन जगावे यासाठी शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाऊंडेशन शालेय स्तरावर कार्यरत आहे. समाज तंबाखूमुक्त करण्यासाठी शाळा हे एक प्रवेशद्वार आहे. जर शाळा तंबाखूमुक्त झाल्या तर समाज देखील तंबाखूमुक्त होईल हा विश्वास आहे. शिक्षण विभागामार्फत तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न मुलं हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यात सर्वच शाळांसोबत यशस्वीपणे राबविलेला आहे. आजमितीस तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न मुलं ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना प्रशिक्षित केले गेले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 4719 शाळांपैकी 765 शाळा तंबाखू मुक्त शाळा ॲप वर तंबाखू मुक्त घोषीत झाल्या आहेत. शाळा तंबाखूमुक्त होण्यासाठी राज्यस्तरावर सर्व शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना माहिती देण्यात आलेली आहे. शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी अनेक पूरक उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत. जिल्हा आणि राज्यस्तरावर सात्यत्याने या कार्यक्रमाचा आढावा देखील घेतला जात आहे जेणे करून या सर्व शाळा तंबाखूमुक्त होण्यास प्रेरित होतील. महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी सर्वाना प्रशिक्षित केले जात आहे. सर्वांनी मिळून महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या तंबाखूमुक्त शाळांचे निकष पूर्ण केले तर आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळा तंबाखुमुक्त होतील आणि सर्व मुले आरोग्यदायी जीवन जगतील.
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास अधिक बळकटी यावी आणि महाराष्ट्रातील सर्व युवक आणि समाज तंबाखूमुक्त व्हावा यासाठी आपण एकत्र येऊया आणि आपल्या शाळा तंबाखूमुक्त करूयात असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले आहे.