मुंबई : इतर राज्यांप्रमाणे राज्य सरकार इंधनावरील शुल्क कपात करून पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करेल ही जनतेची अपेक्षा आज फोल ठरली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून आज सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात इंधनावरील शुल्क कपातीबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. राज्यात पेट्रोलने शंभरी गाठली होती. त्यामुळे अर्थसंकल्पात सरकार कर कपात करेल, अशी अपेक्षा होती. सरकारने गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) प्रतिलिटर १ रुपयाने वाढ केली होती. अर्थमंत्र्यांनी त्याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. यामुळे स्वस्त पेट्रोल डिझेलच्या अपेक्षांचा चुराडा झाला.