No Result
View All Result
- सोलापूर : तेलगू भाषिक व सोलापूरच्या विकासासाठी भारत राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांचं महत्त्वकांक्षी नेतृत्व मान्य केले आहे. उद्या मंगळवारी सकाळी काँग्रेसच्या शहराध्यक्षांकडे राजीनामा सादर करणार आहोत असे स्पष्ट करतानाच आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीत भारत राष्ट्र समितीच्या 10 जागा निवडून येतील, असा दावा काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादुल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
- भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव यांनी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार धर्मण्णा सादुल यांच्याशी संपर्क साधून भारत राष्ट्र समितीमध्ये सक्रिय होऊन काम करण्याची ऑफर दिली. त्यासाठी गेल्या काही दिवसापासून ते त्यांच्या संपर्कात होते. अनेक वर्षापासून मी काँग्रेसमध्ये कार्यरत आहे. काँग्रेसने मला खासदारकी पर्यंतची मोठी संधी दिली असे सांगत धर्मण्णा सादुल हे भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करणार असल्याचे नाकारत होते मात्र अखेर आज सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा तरुण व महत्त्वकांक्षी नेतृत्व असलेले के चंद्रशेखर राव यांचे नेतृत्व मान्य केले असल्याचे जाहीरपणे सांगितले. लवकरच पक्षप्रवेशही करणार आहे, अशी घोषणा केली
- पत्रकार परिषदेत माजी खा. धर्मण्णा सादुल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते पुढे म्हणाले, भारत राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांचं महत्त्वकांक्षी नेतृत्व स्वीकारण्याचे मी मान्य केले आहे. मूळचा मी तेलंगणाचा आहे, त्याचा मला अभिमान आहे. के. चंद्रशेखर राव हे यापूर्वीही संपर्कात होते. अखेर दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांनी आग्रह केला. चर्चा झाली. त्यांचे नेतृत्व मान्य केले असल्याचे माजी खा. धर्मण्णा सादुल यांनी सांगितले. सोलापूर त्याचबरोबर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर महत्त्वपूर्ण चर्चा यावेळी झाली. त्यांची विकासात्मक दृष्टी पाहून काम करायला तयार झालो आहे, असे ते म्हणाले.
- काँग्रेसने खूप काही दिलं. खासदारकीपर्यंतची संधी दिली याबद्दल माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मी ऋणी आहे. काँग्रेस सोडत असल्याचे दुःख होत आहे असे सांगतानाच काँग्रेसमध्ये सहा ते आठ माजी आमदार – खासदार आहेत मात्र नव्याने काँग्रेसमध्ये प्रवेश देत असताना या माजी लोकप्रतिनिधींना विचारात घेतलं जात नाही, असा आरोप माजी खा. सादुल यांनी यावेळी केला. मला साईडला ठेवण्यात आले. ही वस्तुस्थिती आहे पण मी समाधानी आहे ,असेही ते म्हणाले.
- सोलापुरात तेलगू भाषिकांची संख्या सुमारे तीन लाख आहे. ते तेलंगणातून बहुतांश आलेले आहेत. तेलगू भाषिक समाजाच्या समस्या सोडविणे आणि सोलापूरचा विकास भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून करायचा आहे. या भूमिकेतून हा पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला आहे. आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीत भारत राष्ट्र समितीच्या सुमारे दहा जागा निवडून येतील, असा दावा त्यांनी यावेळी केला.
- काँग्रेस पक्षाकडून समजूत घातल्यास निर्णय मागे घेणार का या प्रश्नाच्या उत्तरात माजी खा. सादुल म्हणाले की, आता अंतिम निर्णय घेतला आहे. त्यामुळे माघार नाही. उद्या मंगळवारी सकाळी 11 वाजता काँग्रेस शहराध्यक्ष यांच्याकडे राजीनामा देणार आहोत. जड अंतकरणाने काँग्रेस सोडत आहे, असेही सादुल यांनी स्पष्ट केले.
- सोलापुरात भारत राष्ट्र समितीच्या आगमनामुळे राजकारणात मोठे ध्रुवीकरण होईल. हजारो कार्यकर्ते बी.आर. एस. मध्ये प्रवेश करणार आहेत. भारत राष्ट्र समितीचा फटका भाजपाला बसेल, असेही सादुल यांनी यावेळी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत रघुरामलू कंदीकटला, गणेश पेनगोंडा, विक्रम पिस्के आदी उपस्थित होते.
No Result
View All Result