सुरक्षेच्या दृष्टीने समिती करणार स्थापन दिंडीच्या मानकऱ्यांच्या मागणीनुसार यात बदल करण्यात येऊन एक दिवस आधीच पालखी त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान करणार असून एक दिवस मुक्कामाचे ठिकाणही वाढवण्यात आले आहे.
नाशिक : वारकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पायी दिंडी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असते, हजारो वारकरी यात सहभागी होत असतात. मात्र यंदा इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने तसेच दिंडीच्या मानकऱ्यांच्या मागणीनुसार यात बदल करण्यात येऊन एक दिवस आधीच पालखी त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान करणार असून एक दिवस मुक्कामाचे ठिकाणही वाढवण्यात आले आहे.
दरवर्षी चतुर्दशीच्या दिवशी होणारे प्रस्थान यंदा त्रयोदशीला म्हणजेच 2 जूनला होणार आहे. निवृत्तीनाथ महाराजांचे गुरू गहीनीनाथ महाराजांच्या समाधीस्थळी हा मुक्काम असणार आहे. यंदा 2 ते 28 जून या कालावधीत वारी असून त्यात 42 पेक्षा अधिक दिंड्या सहभागी होणार आहेत. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी अंतर जवळपास चारशे किलोमीटरहून अधिक आहे. दिंडीतील वारकरी मंडळी रोज अंदाजे वीस किलोमीटर पायी प्रवास करतात. तर वेळापत्रकाप्रमाणे रात्री नियोजित असलेल्या ठिकाणी मुक्काम करत दिंडी सत्ताविसाव्या दिवशी पंढरपुरात पोहोचते.
या दरम्यान सतरा मुक्कामानंतर पंढरपूर वारी करून पालखी त्र्यंबकेश्वरकडे माघारी येईल. म्हणजेच 2 जूनला संत निवृत्तीनाथ पालखी निघेल आणि 28 दिवसांचा पायी प्रवास करून 28 जून रोजी पालखी पंढरपुरात दाखल होईल, त्यानंतर परतीचा प्रवास 3 जुलै रोजी सुरु होऊन 20 जुलै रोजी पालखीचे त्र्यंबकेश्वरला आगमन होईल. यंदा विशेष म्हणजे उन्हाचा कडाका आणि इतर आरोग्य तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विविध समित्यांची स्थापनाही निवृत्तीनाथ संस्थानच्या वतीने केली जाणार आहे.