आपत्ती व्यवस्थापन आराखडा अंतर्गत संबंधित विभागानी निधीची मागणी करावी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने पंढरपूर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन, कार्यशाळेत यशदाचे आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे माजी संचालक तथा सेवानिवृत्त कर्नल विश्वास सुपनेकर यांचे मार्गदर्शन झाले.
प्रतिवर्षी पंढरपूर येथे आषाढी व कार्तिकी या दोन मोठ्या वाऱ्या होत असतात. यावेळी लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर शहरात दाखल होतात. अशावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन करण्याच्या वतीने सर्व संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना व स्वयंसेवी संस्थांच्या स्वंयसेवकांना प्रशिक्षण देण्यात येत असते. या माध्यमातून वारीचे योग्य पद्धतीने नियोजन, आवश्यक निधी व उत्कृष्ट अंमलबजावणी झाल्यास वारी यशस्वी होते, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने आयोजित पंढरपूर आपत्ती व्यवस्थापन ऑनलाईन कार्यशाळेत अप्पर जिल्हाधिकारी ठोंबरे मार्गदर्शन करत होते. यावेळी कार्यशाळेचे मार्गदर्शक सेवानिवृत्त कर्नल विश्वास सुपनेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले, महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेलकंदे, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर यांच्यासह महावितरण, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, पंढरपूर तहसील, माळशिरस तहसील, पंढरपूर मुख्याधिकारी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अधिकारी कर्मचारी, राष्ट्रीय महामार्ग, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी ठोंबरे पुढे म्हणाले की, पंढरपूर आषाढी व कार्तिकी वारीच्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय विभागाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणे आवश्यक आहे. शासकीय यंत्रणा यांच्यामध्ये परस्पर चांगला समन्वय राहिल्यास व वारीचे योग्य व्यवस्थापन झाल्यास वारी यशस्वीपणे पार पाडली जाते व त्या पद्धतीने मागील अनेक वर्षापासून आपण वारीचे यशस्वी आयोजन करत आलेलो आहे, असे त्यांनी सांगितले.
वारीच्या कालावधीत प्रत्येक शासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण तणाव असतो. तसेच वारीच्या कालावधीत प्रत्येक विभागाला वारीच्या यशस्वी आयोजनासाठी मोठ्या प्रमाणावर निधीही खर्च करावा लागतो त्या प्रमाणात शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही तरी यापुढील काळात वारीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक शासकीय विभागाने त्यांना आवश्यक असलेल्या निधीची मागणी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडे करावी व त्यांच्या मार्फत शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील, असे अपर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी सूचित केले.
यावर्षीच्या आषाढी वारीत पंढरपूर शहर चार दिवसात स्वच्छ करण्यात आले तर येणाऱ्या कार्तिकी वारीस संपूर्ण पंढरपूर शहर तीन दिवसात स्वच्छ करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. आषाढी व कार्तिकी वारी म्हणजे पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची वारी असून भाविकांना सुविधा देण्यात प्रशासन कमी पडणार नाही, साठी सर्व संबंधित विभागावर सोपवण्यात आलेली जबाबदारी ते परस्परात योग्य समन्वय ठेवून पार पाडतील अशी अपेक्षा श्री ठोंबरे यांनी व्यक्त करून पंढरपूर आपत्ती व्यवस्थापन ऑनलाईन कार्यशाळेचा फिल्डवर काम करताना जास्तीत जास्त वापर सर्वांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.
पंढरपूर आपत्ती व्यवस्थापन आराखड्या अंतर्गत आषाढी व कार्तिकीच्या अनुषंगाने पंढरपूर शहरात येणाऱ्या लाखो भाविकांचे योग्य व्यवस्थापन करून वारीमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही या अनुषंगाने यशदाचे माजी संचालक तथा सेवानिवृत्त कर्नल विश्वास सुपनेकर यांनी सर्व शासकीय यंत्रणेला मार्गदर्शन केले. येणाऱ्या कार्तिकी वारीमध्ये कशा पद्धतीने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण च्या सर्व संबंधित सदस्यांनी आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे याविषयी सविस्तर मार्गदर्शन पीपीटी द्वारे त्यांनी केले. यामध्ये पोलीस विभागाने गर्दीचे नियोजन कसे करावे, वाहतुकीचे नियोजन कसे करावे, तसेच भाविकांनी दर्शन घेऊन कशा पद्धतीने बाहेर पडावे याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याच पद्धतीने महसूल यंत्रणा व मुख्याधिकारी पंढरपूर यांनी कशा पद्धतीने भाविकांसाठी पंढरपूर शहरात सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच पार्किंगची सुविधा कशा पद्धतीने करावी याविषयी त्यांनी माहिती दिली.