येस न्युज मराठी नेटवर्क : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात सातत्याने वादग्रस्त विधाने करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फूस असल्याचा आरोप करताना त्यांना आवरा, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. दरम्यान, ओबीसी आरक्षणाचा डाटा केंद्र सरकारने द्यावा यासाठी येत्या अधिवेशनात ठराव करणार असून प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, सत्ता गेल्याने भाजप नेते सैरभैर झाले आहेत. सत्ता मिळत नाही म्हटल्यावर महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे. त्यासाठी ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांचा वापर सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत करण्यात आली. एखाद्या सत्ताधारी मंत्र्याविरोधात विरोधी पक्षाच्या बैठकीत असा ठराव होण्याचा देशातील हा पहिलाच प्रसंग असावा. केंद्रीय सत्तेचा दुरूपयोग सुरू आहे. यावरून सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जात असल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप मुश्रीफ यांनी केला. हा डाव जनता सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.