सोलापूर : काँग्रेसचे माजी महापौर आरिफ शेख यांनी राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल यांच्या वाढदिनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी खासदारकीसाठी खरटमल यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर या बातमीचे पडसाद गुरुवारी काँग्रेस भवनात उमटले. या प्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आरिफ शेख यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरिफ शेख हे काँग्रेसचे माजी महापौर आहेत, ज्येष्ठ व जबाबदार नेते असून त्यांच्या तोंडून असे शब्द येणे योग्य नाही. त्यांनी त्याचा योग्य खुलासा करावा तसेच ‘कुंकू धन्याचं आणि मंगळसूत्र गण्याचं’ असेही वागू नये असा चिमटा त्यांनी यावेळी काढला आहे.
दरम्यान आरिफ शेख व शकील मौलवी यांनी याचे स्पष्टीकरण देताना सोलापूर लोकसभेसाठी आमचे नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांना डावलून सुधीर खरटमल यांना उमेदवारी नाही तर सोलापूर लोकसभेची जागा ही आता काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीला सुटण्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे जर भविष्यात तसेच झाले तर खरटमल यांना आपण खासदारकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत, त्या मागचा अर्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वेगळा काढू नये, आणि आपण कुणाला खुश करण्यासाठी बोलत नाही, त्याची गरजही आम्हाला नाही असे असे स्पष्टीकरण शेख व मौलवी यांनी दिले.