विमानतळ सल्लागार समितीची बैठक संपन्न
सोलापूर – सोलापूरच्या विकासासाठी विमानसेवा सुरू होणे अत्यावश्यक असून विमानसेवा सुरू करण्यासाठी येणारे अडथळे दूर करण्यासाठी सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्यात. विशेषतः जिल्ह्याच्या विकासासाठी विमानसेवा सुरू होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे सांगून विमानतळ सल्लागार समितीचे चेअरमन, खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी प्रशासनाला सूचना केल्या.
बुधवारी सकाळी विमानतळ सल्लागार समिती, सोलापूर ची बैठक पार पडली. या बैठकीच्या सुरुवातीला विमानसेवा सुरू होण्यासाठी असणाऱ्या अडचणी, अपूर्ण असलेली कामाची माहिती प्रस्तावनेतून विमानतळ अधिकारी हिमांशू वर्मा यांनी दिली. विमानतळ व परिसरात असणाऱ्या अडथळ्यांपैकी विद्युत पोल , ड्रेनेज लाईन, विमानतळाच्या जागेवरील असणारी अतिक्रमणे दूर व्हावीत असे हिमांशू वर्मा यांनी सांगितले. त्यानंतर विषयपत्रिकेतील मुद्द्यांवर उपास्थित सदस्यांनी चर्चा केली.
सोलापूरची विमानसेवा सुरु झाल्यास विकासाला मोठी चालना मिळणार आहे. सोलापुरातील बेरोजगारी, उद्योगधंद्यातील विकास, विशेषतः सोलापूरचा चौफेर विकास होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे सध्या महापालिका प्रशासनाने याबाबत कार्यवाही करावी, असा आदेश विमानतळ सल्लागार समितीचे चेअरमन खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केल्या.
महापालिकेने टेंडर प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता निधी मंजुरीसाठी सभेत विषय ठेवला आहे. परंतु राज्याच्या न्याय व विधी विभागाकडून आमची परवानगी घेतल्याशिवाय चिमणी पाडकाम करू नये असा आदेश आल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
यावेळी उपस्थित निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त वैशाली कडुकर, समितीचे सदस्य डॉ. शिरीष वळसंगकर, प्रकाश हत्ती , महापालिका अधिकारी उपस्थित होते.