सोलापूर विद्यापीठाच्या ‘उद्यम शाळा’ उपक्रमाचा शुभारंभ
सोलापूर, दि. 15- विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच शास्त्रीय दृष्टिकोन असतो. प्रत्येक गोष्टीबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल असते. त्यांच्यातील कल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी तसेच त्यास उद्योगापर्यंत पोहोचण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा ‘उद्यम शाळा’ उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.
बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील उद्यम फाउंडेशन इनक्युबेशन सेंटरच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘उद्यम शाळा’ उपक्रमाचा शुभारंभ कुलदीप जंगम यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रिसिजन कंपनीचे संचालक करण शहा, मयुरा शहा, प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, उत्तर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निम्बर्गी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इनक्युबेशन सेंटरचे संचालक प्रा. व्ही. बी. पाटील यांनी केले. मान्यवरांचा परिचय अधिसभा सदस्य चन्नवीर बंकुर यांनी करून दिला.
यावेळी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी इन्स्पायर अवॉर्ड सारख्या उपक्रमातून आपले टॅलेंट आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध करत असल्याचे सांगितले. विद्यापीठाचा उद्यम शाळा उपक्रम हा विद्यार्थ्यांना निश्चितच बळ देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. करण शहा यांनी इंडस्ट्री बदलत असल्याचे सांगून शालेय विद्यार्थ्यांमध्ये कल्पना भरपूर असतात. एक प्रकारची कुतूहल असते. शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या कल्पनांना बळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणानुसार नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे विद्यार्थी घडवणे आवश्यक आहे. त्यानुसार शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर संस्कार होणे आवश्यक आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करीत असतात. आता विद्यार्थ्यांच्या कल्पनांना देखील बळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास प्राथमिक, माध्यमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्यम शाळा हा उपक्रम प्रिसिजन फाउंडेशन, सर फाउंडेशन, शिक्षण विभाग, स्वावलंबी भारत अभियान, सविष्कार इंडिया यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमास इनक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गुराणी, विनायक बंकापूर, सिद्धाराम माशाळे, हेमा शिंदे आदी उपस्थित होते.
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील उद्यम फाउंडेशन इनक्युबेशन सेंटरच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘उद्यम शाळा’ उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते झाला. यावेळी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्रिसिजन कंपनीचे संचालक करण शहा, मयुरा शहा, प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे व अन्य.