स्वावलंबी भारत अभियान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरतर्फे आयोजन
सोलापूर: महाविद्यालयीन युवकांना उद्योजकतेची माहिती व्हावी आणि स्वरोजगार विषयक शासकीय योजना कळाव्यात याकरिता २१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान स्वावलंबी भारत अभियान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर तर्फे जिल्हास्तरीय उद्योजकता विकास यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अभियानाचे जिल्हा समन्वयक विनायक बंकापुर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उद्योजकता विकास यात्रेचे उद्घाटन सोमवारी (दि. २१) सकाळी अकरा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर उद्योजकता विकासरथ ११ तालुक्यांतील ३० महाविद्यालयांमध्ये जाऊन व्याख्यान, चित्रफित, पत्रके आर्दीच्या माध्यमातून युवकांना उद्योजकतेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अनेक युवकांना व्यवसाय, उद्योग करण्याची इच्छा असते. परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांना व्यवसाय करणे शक्य होत नाही. त्यामुळे स्वावलंबी भारत अभियान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर तर्फे हा उपक्रम घेण्यात येत आहे. व्यवसाय कोणता व कसा निवडावा, व्यवसाय सुरू करण्यासाठीची पूर्वतयारी, शासकीय कार्यालयांमध्ये तसेच बँकांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करावी आदी मार्गदर्शन यावेळी करण्यात येणार आहे.
उद्योजकता विकास यात्रेदरम्यान महाविद्यालय विद्यार्थी आणि लोकांशी संवाद साधून त्यांच्याकडून उद्योजकतेविषयी नव्या कल्पना एकत्र करण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यातून एक अभिनव कल्पना निवडण्यात येणार असून संबंधित व्यक्तीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या इंक्यूबॅशन सेंटरतर्फे १ वर्षासाठी मार्गदर्शन मदत करण्यात येणार आहे. उद्योजकता विकास यात्रेचा समारोप दोन सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेस तंत्र शिक्षण विद्यार्थी परिषदेचे प्रांत संयोजक सचिन पारवे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर इंक्यूबेशन सेंटरचे संचालक सचिन लढा, अभियान विभाग समन्वयक चन्नवीर बंकुर, जिल्हा समन्वयक विनायक बंकापुर, मयांक चव्हाण, ओम इंगळे, ज्ञानेश्वर जाधव, दीपक तरंगे आदी उपस्थित होते.