येस न्युज नेटवर्क : आज रामनवमी. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. सोलापूर शहरातील विविध राम मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. राज्यात देखील रामनवमीचा उत्साह असून शिर्डी, शेगाव, पंढरपूर, आळंदीसह ठिकठिकाणी मंदिर गजबजली आहेत.
रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत लाखो साईभक्त दाखल झाले आहेत. कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने यावर्षी मोठा उत्साह साईभक्तांमध्ये दिसून येतोय. रामनवमी उत्सव शिर्डीत तीन दिवस साजरा केला जातो. आज उत्सवाचा मुख्य दुसरा दिवस असून दिवसभर विविध कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने साजरे केले जात आहेत. या वर्षी पालख्या घेऊन येण्यास परवानगी असल्याने राज्यभरातून साईनामाचा जयघोष करत शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत आज रामनवमीचा मोठा उत्साह बघायला मिळतोय. आज सर्व साईभक्तांना दर्शन घेता याव यासाठी मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुपारी 4 वाजता निशाण मिरवणूक तर सायंकाळी 5 वाजता रथ मिरवणूक ही काढण्यात येणार आहे