सोलापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसे-भाजपा युती होणार अशी चर्चा सुरू झाली. त्यातच काहींनी तर शिवसेनेचे नेतृत्व राज ठाकरेंना सोपवणार असा दावाही केला. माध्यमांतही या बातम्या झळकू लागल्या. परंतु भाजपा-मनसे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सध्या मौन बाळगलं आहे.
आता राज ठाकरेंकडे शिवसेनेचे नेतृत्व दिले तर त्याचा स्वीकार शिंदे गटातील आमदार, खासदार करणार का असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर पत्रकारांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना हा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात राज ठाकरेंकडे नेतृत्व देण्यास विरोध केला. आमदार शहाजी पाटील म्हणाले की, मी सध्या सांगोल्यात आहेत. मला अशाप्रकारच्या प्रस्तावाबाबत कुठलीही माहिती नाही. त्यात मी अज्ञानी आहे. परंतु आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख हे एकनाथ शिंदेंच राहिले पाहिजे. त्यात आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही. त्यात काही असेल त्याला आम्ही नकार देऊ. असं अजिबात चालणार नाही असं आम्ही स्पष्ट सांगतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.