मुंबई दि.20- नवीन पिढी संस्कांरावर तयार होते. समाजातील विविध अनिष्ठ प्रथा बंद करण्यासाठी व शोषित- पीडीत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे कारण शिक्षणाद्वारेच उत्तम संस्कार बिंबविला जातो. भटके विमुक्त प्रवर्गातील सर्व छोटया मोठया समाजाने शिक्षण हा मुख्य आधार घटक लक्षात घेऊन वाटचाल करावी तसेच या समाजाच्या उन्नतीशी निगडीत सर्व मंत्रालयीन विभागांनी विकास योजनांची आखणी करून येणाऱ्या अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करावी अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीत दिल्या.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत भटक्या विमुक्त प्रवर्गातील महिलांच्या विविध समस्यांबाबत विधानभवन येथे ‘भटके विमुक्त महिला परिषद’ च्या अध्यक्षा डॉ. प्रियंका राठोड यांनी दिलेल्या निवेदनासंदर्भात बैठकीचे आयोजन आज दि.20 जानेवारी रोजी करण्यात आले.
यावेळी इतर मागासवर्गीय बहूजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता (भाप्रसे), संचालक दिलीप हळदे, आदिवासी विकास विभागाचे सहसचिव भा. र. गावित, महिला व बालविकास विभागाचे सहसचिव शरद अहिरे, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी शंकर पवार, नंदूभाऊ पवार, आकाश जाधव, निहारीका खोंदले, ॲड रंजना पगार-गवांदे, कोमल वर्दे, आशा जोगी, नंदिनी सोनावणे, शांता चव्हाण, अश्विनी जाधव, दिपाली भोसले – सय्यद, लीला चव्हाण, लक्ष्मण गायकवाड आणि प्रियंका राठोड आदि उपस्थित होते.
भटके विमुक्तांच्या समस्या सोडविण्यासाठी कामगारांच्या मुलींसाठी माथाडी कामगारांच्या धर्तीवर शैक्षणिक विशेष योजना राबविण्यात यावी, बालविवाह बंदीसाठी विशेष शिक्षण मोहिम राबविण्यात यावी, इयत्ता पाचवी पासून शालेय अभ्यासक्रमात स्वसुरक्षितता व रक्षणासाठी सैनिकी शिक्षण देण्यात यावे, पदवी पर्यंतचे शिक्षण मोफत देण्यात येऊन परदेश शिक्षण घेण्यासाठी एस.सी./एस.टी. च्या धर्तीवर मुलींना सुविधा लागू करण्यात याव्यात, जात पंचायत व्यवस्थेला बळी पडलेल्या महिलांचे पुनर्वसन करण्यात यावे, 50 वर्ष पूर्ण केलेल्या महिलांसाठी 3000 रु. ची अर्थसहाय योजना सूरू करण्यात यावी,.