येस न्युज मराठी नेटवर्क : पनामा पेपर लीक प्रकरणी बच्चन कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी बच्चन कुटुंबियांची सून बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिला ईडीनं समन्स बजावलं आहे. पनामा पेपर लीक प्रकरणी ईडीनं हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. पनामा पेपर्स काल रात्रीपासून ट्वीटरसह अन्य सोशल मीडियावर जगभरात टॉप ट्रेडिंगमध्ये आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये आज हाच विषय प्रामुख्याने चर्चिला जात आहे
दरम्यान, पनामा पेपर लीक प्रकरणी बच्चन कुटुंबाचंही नाव समोर आलं होतं. तेव्हा ईडीनं याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचाही गुन्हा नोंदवला होता. अंमलबजावणी संचालनालयाचे एचआययू या प्रकरणाची चौकशी करत आहे.
भारतात बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, डीएलएफचे केपी सिंह, इक्बाल मिर्ची आणि उद्योगपती अडाणी यांच्या ज्येष्ठ बंधूचा पनामा पेपर्समध्ये समावेश असल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं होतं. इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटीव जर्नालिस्ट्स आणि ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट या दोन प्रकल्पातील पत्रकारांनी घेतलेल्या शोधमोहीमेतून हा गौप्यस्फोट झाला होता. जागतिक शोध पत्रकार समूहात तब्बल 78 देशातील 107 पत्रकार संघटनांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील इंडियन एक्स्प्रेस असल्याचं सांगितलं जात होतं.