सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी येथील डी. ए. व्ही. वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्समधील तज्ञ प्राध्यापक डॉ. दीपक ननवरे यांची विशेष कार्यासन अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी दिली.
शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. यामध्ये परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून व्यवस्थापन परिषदेकडे परीक्षा विभागाच्या कामात मदत व्हावी तसेच सुसूत्रता यावी यासाठी डॉ. दीपक ननवरे यांची विशेष कार्यासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी यासंदर्भात शिफारस करण्यात आली होती. त्यास सर्व सदस्यांनी एकमताने मान्यता दिली. डॉ. ननवरे हे गेल्या 25 वर्षांपासून उच्च शिक्षण क्षेत्रात अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर ते सदस्य म्हणून काम केले आहेत. नॅक कमिटीचे देखील सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांचे अनेक शोध निबंध प्रकाशित आहेत. तंत्रज्ञानाचा देखील त्यांना चांगला अनुभव आहे. अशा अनुभवी व्यक्तीची परीक्षेच्या कामकाजासाठी निवड करण्यात आली आहे.
परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येईल व उपयोजना करण्यात येईल, अशी ग्वाही प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी दिली. तसेच यंदाच्या वर्षी या सत्रासाठी विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क माफ करण्याच्या प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांच्या सुचनेचे सर्व सदस्यांनी स्वागत करून त्याबाबत निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीचे सचिव म्हणून कुलसचिव योगिनी घारे यांनी कामकाज पाहिले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणिक शहा तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.