हातभट्ट्यांवरही धडक कारवाई ढाब्यावरही मद्यपींना अटक
राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी (ता. 20 जून) उपळाई (बु) येथे होटेल जगदंबा येथे टाकलेल्या धाडीत देशी विदेशी दारुचा साठा मिळून आला तसेच करमाळा येथील होटेल आकाश येथून मालकासह दोन मद्यपींना अटक करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, निरीक्षक पंढरपूर विभाग किरण बिरादार यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी माढा ते शेटफळ रोडच्या कडेला उपळाई (बु) गावाच्या हद्दीत होटेल जगदंबा येथे धाड टाकली असता त्या ठिकाणी देशी दारु व बीयरच्या बाटल्या मिळून आल्या. तसेच होटेलसमोरील कारची झडती घेतली असता कारच्या डिक्कीत विदेशी मद्याच्या 2000 मिली क्षमतेच्या बाटल्या मिळून आल्याने प्रमोद सुधीर पाटील वय 26 वर्षे या इसमास अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून 20 हजार किंमतीच्या दारुसह मारुती स्विफ्ट कार क्र. MH12 FF 5168 जप्त करण्यात आली. त्यांनी उपळाई (बु) येथील अन्य होटेल व दारु विक्री केंद्रांवर टाकलेल्या धाडीत किशोर वसंत पाटील वय 28 वर्षे, समीर महिबूब सय्यद वय 49 वर्षे व पोपट गणपत कांबळे वय 48 वर्षे या इसमांना देशी विदेशी दारुची विक्री करतांना अटक करण्यात आली असून त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई निरिक्षक किरण बिरादार, सहाय्यक दुय्यम निरिक्षक जीवन मुंढे, जवान गणेश रोडे व वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली.
एका अन्य कारवाईदरम्यान प्रभारी दुय्यम निरिक्षक सूरज कुसळे यांनी मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास करमाळा तालुक्यातील होटेल आकाश या धाब्यावर टाकलेल्या छाप्यात होटेल मालक पोपट शंकर करंडे, वय 43 वर्षे रा. करमाळा व दोन मद्यपी ग्राहक नामे अंकुश रामदास जाधव, वय 41 वर्षे रा. निगडी जि. पुणे व बापू विश्वनाथ माने , वय 48 वर्षे रा. पिंपळे गुरव जि. पुणे यांना अटक करण्यात आली. तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून बुधवारी गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी करमाळा यांनी हॉटेल चालकाला पंचवीस हजार रुपये दंड व ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड असा एकूण सत्तावीस हजारांचा दंड ठोठावला. ही कारवाई प्रभारी दुय्यम निरिक्षक सूरज कुसळे, सहायक दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर व विकास वडमिले यांच्या पथकाने पार पाडली.

तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारु विरोधात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत बुधवारी पहाटे 6 वाजेच्या सुमारास बक्षी हिप्परगा तांडा (ता. दक्षिण सोलापूर) परिसरात हातभट्टी दारु भट्ट्यांवर छापे टाकून 6 गुन्हे नोंदविले. या कारवाईत हातभट्टी दारु निर्मितीकरीता लागणारे 12450 लिटर गुळमिश्रित रसायन, 400 लिटर हातभट्टी दारु, लोखंडी भट्टी बॅरल, प्लॅस्टिक बॅरल इत्यादी साहित्य असा एकूण रु. तीन लाख आठ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई प्रभारी उपअधीक्षक सदानंद मस्करे यांच्या नेतृत्वाखाली निरिक्षक राहूल बांगर, सुनिल कदम, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, अक्षय भरते, कृष्णा सुळे, रामलिंग भांगे, मानसी वाघ, सचिन गुठे, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, जवान किरण खंदारे, अनिल पांढरे, चेतन व्हनगुंटी, प्रशांत इंगोले, इस्माईल गोडीकट, शोएब बेगमपुरे, योगीराज तोग्गी, वसंत राठोड, आनंद दशवंत व वाहनचालक रशिद शेख यांनी पार पाडली.
आवाहन

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणे व ढाब्यांवर छापे टाकण्यात येत आहे. ढाब्यांवर दारु विक्री करणे व दारु पिणे कायद्यान्वये गुन्हा असून याविरोधात कारवाईसाठी विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आलेली आहेत. कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे