सोलापूर :- सर्व शासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 सर्वसाधारण योजनेअंतर्गतचे प्रस्तावित केलेल्या कामानुसार परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 सर्वसाधारण योजना आढावा प्रसंगी पालकमंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, विभागीय उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, नगर पालिका प्रशासन चे सह आयुक्त आशिष लोकरे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे पुढे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण साठी 527 कोटीचा निधी मंजूर असून या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी घेण्यात येणाऱ्या कामाचे परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत. मागील वर्षी कृषी विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग, वीज वितरण कंपनी, जलसंधारण व सार्वजनिक बांधकाम विभाग आदींनी वेळेत प्रस्ताव सादर केलेले नव्हते. त्यामुळे या विभागांनी अधिक दक्षता बाळगून वेळेत प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
ज्या गावात ग्रामसचिवालय नाही अशा गावात ग्रामसचिवालय निर्माण करावेत. प्रत्येक गावात एक अभ्यासिका प्रस्तावित करावी. तसेच ऑक्सीजन पार्क निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या आमदार बबनदादा शिंदे यांनी करून विविध विकास कामांसाठी नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून द्यावा असेही त्यांनी सूचित केले.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या प्रत्येक गावाचा विकास घडवून आणावयाचा आहे. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असलेल्या कामांचा समावेश प्रस्तावात करावा. गावांचा विकास साधत असताना राजकारण विरहित काम करावयाचे आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांनी नियोजन समिती सदस्य यांच्या सूचनांचा ही विचार प्रस्ताव सादर करताना केला पाहिजे, असे पालकमंत्री भरणे यांनी सूचित केले.
या वर्षी जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांसाठी 174 कोटीचा निधी आहे. त्याप्रमाणेच कृषी विभाग 10 कोटी, वन विभाग 26 कोटी, वीज वितरण कंपनी 30 कोटी, जलसंधारण 17 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभाग 19 कोटी व क्रीडा विभाग 14 कोटी निधी मंजूर असून या यंत्रणांनी नियोजित कामाचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत. मागील वर्षी प्रमाणे प्रस्ताव सादर करण्यात दिरंगाई होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दराडे यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 साठी 527 कोटीचा निधी मंजूर असून सर्व शासकीय यंत्रणांनी आयपास(I-PAS) या प्रणालीद्वारे प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव नियोजन कार्यालयाकडे सादर करावेत. मान्यताही या प्रणालीद्वारे संबंधित यंत्रणेला देण्यात येतील. याबाबत काही अडचण असेल तर नियोजन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन ही त्यांनी केले.
जिल्ह्यात पुरेसा खत साठा उपलब्ध
मान्सूनचे आगमन लवकरच होण्याची शक्यता असून शेतकरीवर्ग खरीप हंगामाच्या दृष्टीने कामाला लागलेला आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवश्यक तेवढा खत साठा कृषी विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्याला यावर्षीही मागील वर्षी प्रमाणे 2 लाख 33 हजार 272 मेट्रिक टन खताचे आवंटन उपलब्ध झालेले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला पुरेसा खत मिळेल, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी अंतर्गतच्या कामाचा आढावा
सोलापूर शहरातील स्मार्ट सिटी च्या कामाचा आढावा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला व या अंतर्गत प्रलंबित असलेली कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला त्यांनी दिले. सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा होण्यासाठी आवश्यक असलेल्या दुहेरी पाईपलाईन कामाची माहिती घेऊन ही कामे साधारणतः जुलै महिन्यात सुरू करण्याबाबत भरणे यांनी स्मार्ट सिटी कामाचे मुख्याधिकारी ढेंगळे-पाटील यांना निर्देशित केले.
यावेळी पालकमंत्री भरणे म्हणाले की सोलापूर शहराच्या दुहेरी पाईपलईन प्रमाणेच बार्शी व मंगळवेढा येथील पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन चा प्रश्न मार्गी लावून या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.