सोलापूरातील बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सोलापूर जिल्ह्यातील ५१ शाळांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. दि. २५/०७/२०२४ रोजी हॉटेल बालाजी सरोवर प्रिमिअर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले, क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या हस्ते साहित्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकिय संचालक डी. राम रेड्डी, स्वतंत्र संचालिका डॉ. उमा प्रधान, बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे व्यवस्थापकिय संचालक एन. राजेश्वर रेड्डी, स्वतंत्र संचालक राजेंद्रकुमार तापडीया व सीएसआर प्रमुख व तांत्रिक सल्लागार एम. ए. बिराजदार उपस्थित होते.


बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून जिल्ह्यातील ८ शाळांना ११ स्मार्ट टीव्ही, १३ शाळांना २२ संगणक, ३ शाळांना प्रोजेक्टर, २ शाळांना विज्ञान साहित्य, ४ शाळांना RO मशिन्स, ३ शाळांना सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन व १९ शाळांना ३७२ डेस्कचे वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आयुक्त शीतल तेली-उगले यांनी बालाजी उद्योग समूहाकडून केल्या जाणाऱ्या समाजोपयोगी कामाचे कौतुक केले आणि बालाजी अमाईन्सकडून सीएसआर अंतर्गत केलेल्या स्मशानभूमी आणि डफरिन हॉस्पिटलच्या नूतनीकरणाच्या कामाचे आवर्जून उल्लेख केले. क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी कंपनीच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या आणि सर्व शाळांच्या प्रतिनिधींना मिळालेल्या साहित्यांचा योग्य प्रकारे वापर करण्याचे आव्हाहन केले.