नॅशनल सेक्रेटरी मनीष सुत्रावे व एरिया गव्हर्नर सविता अभंगे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द
सोलापूर : भावसार व्हिजन सोलापूर क्लबच्या वतीने बुधवार दि. 31 जुलै 2024 रोजी सायं. 6 वा. पत्रकार भवन येथे शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भावसार व्हिजन सोलापूर क्लबच्या या अतिशय महत्त्वकांक्षी कार्यक्रमाप्रसंगी हैद्राबादहून नॅशनल सेक्रेटरी मनीष सुत्रावे व पुण्याहून एरिया गव्हर्नर सविता अभंगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर क्लबचे अध्यक्ष प्रणिता महिंद्रकर, सचिव विशाल खमितकर, नॅशनल डायरेक्टर शिवाजी उपरे, माजी गव्हर्नर गिरीश पुकाळे व फाउंडेशन डायरेक्टर आशिष जवळकर आदी होते.
कार्यक्रमाची सुरुवात गायत्री महामंत्राने करण्यात आली. सर्वप्रथम कार्यक्रमाची प्रस्तावना व मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष प्रणिता महिंद्रकर यांनी केले.
एरिया गव्हर्नर सविता अभंगे म्हणाल्या की, 25 गरजू विद्यार्थिनींना शोधून त्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून आर्थिक मदत करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि हा उपक्रम गेली 9 वर्षे सातत्याने करीत आहेत. त्यासाठी यामागे या क्लबचे उत्तम टीम वर्क व कठोर परिश्रम दडलेले आहे. मिळालेल्या पैशाचा सदुपयोग सर्व विद्यार्थिनींनी आपल्या शैक्षणिक उन्नतीसाठी करावा व भावसार समाजाचे नाव उज्वल करावे. जेणेकरून एक सुदृढ व सुसंस्कृत समाज निर्माण होईल.
त्यानंतर उपस्थित 25 भावसार विद्यार्थिनींना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रत्येकी 6000 रुपयाचे धनादेश चे वाटप करण्यात आले.
त्यानंतर नॅशनल सेक्रेटरी मनीष सुत्रावे हे सर्व उपस्थित विद्यार्थिनींना उद्देशून म्हणाले की, जीवनामध्ये कोणत्याही कार्याची सुरुवात शून्यातून होते. सर्वप्रथम एखादी संकल्पना आपल्याला सुचली व ते यशस्वी करण्यासाठी ची इच्छा मनात प्रबळ झाली तर यश नक्की मिळते. जीवनामध्ये अनेक चढ उतार येत असतात, परंतु न डगमगता येणाऱ्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे. आज भावसार व्हिजन सोलापुर क्लब च्या वतीने 25 विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये याप्रमाणे सुमारे दीड लाख रुपयाचे वाटप येथे झाले आहे. ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. असा हा कार्यक्रम बघून मला माझ्या जीवनातील चढ-उतार प्रकर्षाने आठवत आहेत.
फाउंडेशन डायरेक्टर आशिष जवळकर म्हणाले की, या उपक्रमासाठी गेल्या दोन महिन्यापासून सर्वजण परिश्रम घेत आहेत. त्याचा परिपाक म्हणून आज हा उपक्रम आपण करू शकत आहोत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मी आभारी आहे.
सूत्रसंचालन माजी अध्यक्ष संतोष पुकाळे यांनी केले, तर सभेच्या शेवटी सचिव श्री. विशाल खमितकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे पालकांचे व या उपक्रमासाठी सहकार्य केलेल्या सर्व देणगीदारांचे आभार मानले.