येस न्युज मराठी नेटवर्क : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील गेल्या काही वर्षांच्या वादाला त्यां दोघांनीच पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही राजघराण्याचा शिष्टाचार पाळत एकमेकांचे स्वागत केले. दोघांत पाच मिनिटे दिलखुलास चर्चा झाली. पुण्याला जायचे म्हणून रामराजे निघाले तेव्हा करोना साथ असल्याने उदयनराजेंनी रामराजेंना ‘टेक केअर’, ‘लवकरच भेटू’ असे म्हणाले, तर रामराजेंनीही उदयनराजेंना ‘काळजी घ्या…’ असे सांगितले.
रामराजे नाईक निंबाळकर व उदयनराजे भोसले यांच्यातील वाद मागील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधीपासून सुरू आहे. हा वाद मिटविण्याचा प्रयत्न खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केला. पण उदयनराजें व रामराजेंचा थेट राजघराण्याच्या स्वभावामुळे यात यश आले नाही. दोघांमध्ये २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत व कायम वादविवाद होत राहिले.
उदयनराजेंनी फलटणला जाऊन तर रामराजेंनी साताऱ्यात येऊन एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान देत एकमेकांची उणी -दुनी काढत राजशिष्टाचार गुंडाळून ठेवले होते. त्यानंतर हा वाद मागील सातआठ वर्ष पहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये माझं स्थान कमी करण्याचा रामराजे प्रयत्न करतात,माझ्या राजकारण समाजकारणात आडवे येतात असा समज झाल्याने वाद होता. मागील निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व आमदार बरोबर घेऊन रामराजेंनी उदयनराजेंना कोंडीत पकडत उदयनराजेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित असताना बहिष्कार टाकला होता. दोघेही एकमेकांवर संधी मिळताच जोरदार आरोप प्रत्यारोप करायचे. पुढे उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशानंतर झालेल्या निवडणुकीनंतर वाद पुन्हा बाजूला पडला. पण आज सातारच्या शासकिय विश्रामगृहात गेल्यावर्षी जूनमध्ये घडला तसाच प्रकार घडला. जिल्हा बॅंकेची सभा उरकून रामराजे नाईक निंबाळकर शासकिय विश्रामगृहात थांबले होते.