पुणे : ललित पाटील ससून रुग्णालयातून पलायन प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलीस मुख्यालयातील दोन कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहे. ललित पाटील पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षास तीन तास उशीरा देणाऱ्या दोन पोलीसांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहे. हे दोघे ललित सोबत एक्सरेसाठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयात आजारपणाचं कारण देत ड्रग्स रॅकेट चालवत होता. त्यावेळी ससून रुग्णालयातील गेटवर 2 कोटी 14 लाखांचं ड्रग्स सापडलं होतं. त्यानंतर हे सगळं मोठं ड्रग्स रॅकेट पुढे आलं. या रॅकटेचा तपास करताना बड्या लोकांचा हात असल्याचं समोर आलं. त्यानंतर सगळ्यांची कसून चौकशी सुरु झाली. ससून रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, कारागृह पोलीस, कारागृहातील डॉक्टरांसह ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं आणि सहा जणांना निलंबित करण्यात आलं होतं. ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयात एक्स रे साठी दोन कर्मचारी घेऊन जाणार होते.मात्र हे दोघे ललित पाटील सोबत एक्सरेसाठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. एवढच नाही तर नियंत्रण कक्षास ही माहिती तब्बल तीन तास उशीरा देण्यात आली.
बडतर्फ दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे समोर
पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पुणे पोलीस मुख्यालयातील या दोन्ही कर्मचाऱ्यांना आता सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षास माहिती दिली असती तर पळून गेलेल्या ललीत पाटीलला पकडता आले असते. परंतु या दोघांनी वरीष्ठ अधिकारी तसेच नियंत्रण कळवले नाही, चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे.