मुंबई : राज्यातील आरक्षणाच्या मागण्यावरुन विविध समाजाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून सरकारकडूनही त्यांना आश्वासन दिलं जात आहे. एकीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. तर, धनगर समाजबांधवांकडूनही राज्यात विविध ठिकाणी धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, धनगर व धनगड एकच आहे, असे सांगत आंदोलन करण्यात येत आहे. आता, धनगर समाजाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणासंदर्भात मोठं विधान केलं आहे. आचारसंहितेपूर्वी धनगर आरक्षणासंदर्भात जीआर निघेल, असा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. तसेच, यावेळी, विरोधकांवर सडकून टीकाही त्यांनी केली.
आचारसंहितेपूर्वी धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लागेल अशी आम्हाला आशा असून मुख्यमंत्री व महाराष्ट्र सरकार यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा धनगर नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. आजवर धनगर समाजाला कायम फसवण्याचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडून झाले होते, आता पहिल्यांदाच कुठेतरी धनगरांना न्याय मिळायची वेळ आल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी धनगर व धनगड हे दोन्ही एक असल्याचा जीआर काढायची तयारी दर्शवली आहे. याशिवाय धनगर समाजाच्या इतर प्रमुख मागण्याही त्यांनी मान्य करण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये शिंदे समितीला कर्नाटक व गोवा या दोन राज्यातून जी काय माहिती मिळणार आहे, ती गोळा करावी लागल्यास परवानगी दिली जाणार आहे. तसेच, इतर पाच राज्यात गोळा केलेली माहिती शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती पडळकर यांनी दिली.