येस न्युज नेटवर्क : आयपीएलच्या 15 व्या हंगामावर देखील आता कोरोनाचं सावट गडद होताना दिसत आहे. दिल्ली संघाशी संबधित पाच जणांना कोरोनाची लागण झाली असून यात परदेशी खेळाडूचाही समावेश आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने एक महत्त्वाचा बदल केला आहे. दिल्ली संघाच्या पंजाब किंग्ससोबत होणाऱ्या बुधवार 20 एप्रिल रोजीच्या सामन्याचं ठिकाण पुण्यावरुन बदलून मुंबई करण्यात आलं आहे. आधी हा सामना पुण्याच्या एमसीए मैदानात होणार होता. पण आता हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार आहे. मंगळवारी बीसीसीयने याबाबतची माहिती दिली.
सद्यस्थितीला दिल्ली संघातील फिजियो पॅट्रिक फरहार्ट, मसाज थेरपिस्ट चेतन कुमार, खेळाडू मिचेल मार्श, संघाचे डॉक्टर अभिजीक साळवी आणि सोशल मीडिया कटेंट टीम मेंबर आकाश माने यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान सध्या सर्व संघ मुंबईत असून 20 तारखेच्या सामन्यासाठी पुण्याला संघ जाताना इतक्या लाबंच्या प्रवासात एकाच बसमधून जाताना कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी होण्याची भिती असल्याने हा निर्णय घेतल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे. कोरोनाबाधित सर्व रुग्णांना सध्या विलगीकरणात आणि देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.