सोलापूर विद्यापीठात विकास पत्रकारितेवर राष्ट्रीय परिसंवाद संपन्न
सोलापूर, दि. 28- भारतीय पत्रकारितेचा इतिहास हा खूप मोठा असून येथील वृत्तपत्र व पत्रकारांची भूमिका ही नेहमीच देशाच्या विकासासाठी राहिली आहे. समाज व देशाच्या प्रगतीसाठी विकास पत्रकारितेची अतिशय गरज असून आजपर्यंत विकास पत्रकारितेने मोठे योगदान दिल्याचे गौरवोद्गार विजापूर येथील कर्नाटक स्टेट युनिवर्सिटीचे माजी कुलगुरु प्रा. डॉ. ओंकार काकडे यांनी काढले.
मंगळवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभाग, सोलापूर विज्ञान केंद्र आणि सुसंवाद माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विज्ञान, पर्यावरण आणि विकास पत्रकारितेतील नवे प्रवाह’ या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन डॉ. काकडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरातत्वशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील या होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख डॉ. निशा पवार, मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठातील डेव्हलपमेंट कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख डॉ. मीरा देसाई, मध्य प्रदेशातील माखनलाल चतुर्वेदी विदयापीठाचे डॉ. संदीप भट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तविदया विभागातील प्रा. योगेश बोराटे, जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार पंकज पाटील, विज्ञान केंद्राचे संचालक राहुल दास, सुसंवाद संघटनेचे सचिव सचिन गायकवाड यांची उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मासकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘सोशल मिडिया फॉर पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. पुढे बोलताना डॉ. काकडे यांनी विज्ञान व तंत्रज्ञान यामुळे मोठे संशोधन होऊन विकास होत असल्याचे स्पष्ट केले. विकास पत्रकारितेसाठी या बाबी फार महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. माया पाटील यांनी डॉ. चिंचोलकर यांनी मास कम्युनिकेशन विभागाचा मोठा विकास केला व पर्यायाने विद्यापीठाचाही विकास झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
‘माध्यमांची विकासात भूमिका’ या विषयावरील चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, तरुण भारतचे संपादक विजयकुमार पिसे, सकाळचे वरिष्ठ पत्रकार रजनीश जोशी, दिव्य मराठीचे वरिष्ठ पत्रकार सिद्धाराम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी माध्यमांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. अंबादास भासके यांनी मानले.
फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित विकास पत्रकारितेवरील राष्ट्रीय परिसंवादात डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘सोशल मिडिया फॉर पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट’ या ग्रंथाचे प्रकाशन करताना विजयपूरचे माजी कुलगुरू डॉ. ओंकार काकडे, डॉ. माया पाटील, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, डॉ. मीरा देसाई, डॉ. निशा पवार व अन्य.