सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भूशास्त्र संकुल आणि केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉंलॉजी डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 16 ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत रेशीम उत्पादन व अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयाशी निगडीत ‘ए मल्टी मेगा इव्हेंट ऑन इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज फॉर विकसित भारत’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमुळे सिल्क सायन्स व टेक्नॉलॉजीला नवा आयाम मिळणार असून नवसंशोधकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, नवउद्योजकांसाठी हा कार्यक्रम पर्वणी ठरणार आहे. याअंतर्गत ‘सिल्क फाईब्रॉईन याविषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद, विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, सिल्क सायन्स या विषयावर प्रदर्शन, ‘डिस्टा 2024’ या तांत्रिक स्पर्धेचे आयोजन या निमित्ताने केले जाणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध कमिटी बनवण्यात आल्या आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी विविध देशातून, राज्यातून संशोधक व उद्योजक उपस्थित राहणार आहेत. यासाठी आर्थिक सहाय्य विविध शासकीय निमशासकीय विभाग तसेच सामाजिक संस्था उद्योग समूह यांच्यामार्फत होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी उद्योजकांना व सामाजिक स्वयंसेवी संस्थांना सहकार्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
‘सीआरटीडी’चे डायरेक्टर व डी.वाय. पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले की, रेशीम कोळी व रेशीम किडे यापासून मिळणारे रेशीम म्हणजेच सिल्क हे पदार्थविज्ञान संशोधनासाठी महत्वाचा घटक असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. सिल्क हे प्रोटिन्सने समृद्ध असल्यामुळे व त्याच्या असलेल्या विशिष्ठ जैवगुणधर्मामुळे ते इतर पॉलिमर्सपेक्षा सरस ठरते.