सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील गॅस सिलेंडर वितरणाचे नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीची बैठक घेतली असून व्यावसायिक वापरासाठी होणाऱ्या गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी गॅस कंपन्यांच्या समन्वय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात एकूण १४ गॅस एजन्सी कार्यरत आहेत. यामध्ये बीपीसीएलच्या ५४, एचपीसीएलच्या २० आणि आयओसीएलच्या २० एजन्सींचा समावेश आहे. अवकाळी युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर वितरण नियमांमध्ये काही बदल करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.या बदलांनुसार व्यावसायिक वापरासाठी होणाऱ्या गॅस सिलेंडरचे बुकिंग पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र शासकीय संस्था, रुग्णालये, एनटीपीसी तसेच अन्नछत्र मंडळांना या नियमातून सूट देण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठ्याबाबत उच्चस्तरीय चर्चा सुरू असून सर्व बाबींचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर मिळण्याचा प्रतीक्षा कालावधी २५ दिवसांपर्यंत करण्यात आला आहे. सिलेंडर वितरण करताना ग्राहकांच्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीची पडताळणी बंधनकारक करण्यात आली असून ई-केवायसी देखील केली जाणार आहे.गॅस वितरणात पारदर्शकता राहावी आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तालुका स्तरावर दक्षता पथके स्थापन केली जाणार आहेत. ही पथके गॅस एजन्सींची तपासणी करून सिलेंडरच्या आवक-जावकावर नियंत्रण ठेवतील.
सोलापूर जिल्ह्यात फेब्रुवारी २०२६ अखेर घरगुती गॅस ग्राहकांची संख्या ११ लाख ६८ हजार २५६ इतकी असून व्यावसायिक गॅस ग्राहकांची संख्या १० हजार ६०० आहे. जिल्ह्यात दररोज घरगुती गॅसची २५० मेट्रिक टन तर व्यावसायिक गॅसची १० मेट्रिक टन इतकी गरज आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल किंवा घरगुती गॅसचा तुटवडा भासणार नाही. त्यामुळे नागरिकांनी अतिरिक्त साठा न करता प्रशासनाला सहकार्य करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.
