मुंबई : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. किमान तापमान अनेक ठिकाणी २० अंश सेल्सिअसच्याही खाली गेले आहे. पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. अपवादात्मक ठिकाणे वगळता कमाल तापमानही ३४ अंश सेल्सिअसच्या आत आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण- मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून राज्यात थंड वारे येत आहेत. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. मध्यरात्री आणि पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. किमान तापमान राज्यात अनेक ठिकाणी २० अंश सेल्सिअसच्याही खाली गेले आहे. तर कमाल तापमान अपवादात्मक ठिकाणे वगळता ३४ अंश सेल्सिअसच्या खाली आहे. मागील दोन दिवसांपासून नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्रात १८ अंश सेल्सिअसपर्यंत पारा आला आहे. मंगळवारी (२९ ऑक्टोबर) महाबळेश्वर येथे १५.४ अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.