गोदूताई वसाहतीच्या अंतर्गत सर्वांगीण 100 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकार कडून आणण्याची आडम मास्तर यांची भीष्म प्रतिज्ञा
सोलापूर दिनांक – ॲमस्टर डम स्थित एका बहुराष्ट्रीय संस्थेकडून प्रतिवर्षी The Transformative Cities-2018 (अमुलाग्र बदल शहरे-२०१८) या नावाने तीन जागतिक स्तरावरील पुरस्कार जाहीर होतात. हे पुरस्कार पाणी, ऊर्जा आणि निवास आदींवर काम करणाऱ्या संस्थांना दिल्या जातात. या साठी भारत, नायझेरिया, फ्रांस, मॉरीशस, टांझानिया, स्पेन आदि विविध देशांतून विविध संस्थांच्या नोंदणी घेतल्या जातात व पुरस्काराची घोषणा केली जाते. यामध्ये या घरकुल योजनेस दि.८ जुन २०१८ रोजी The Transformative Cities-2018 पुरस्काराने सन्मानित केले आहे. अशा या अभूतपुर्ण भव्य घरकुल योजनेने फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला संपूर्ण जगात प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे.
कॉ. गोदुताई परुळेकर गृहनिर्माण संस्था व मिनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण ह्या दोन्ही संस्था माळरानावर वसलेल्या आहेत. ह्या वसाहती अंतर्गत ये-जा करण्याकरीता कच्चे रस्ते हे मातीचे आहेत त्यामुळे उन्हाळ्यात खूप धूळ उडते व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल होतो. त्यामुळे सर्वांना स्वत:च्या घरापर्यंत जाण्याकरीता खूपच त्रास होतो व त्यातच ह्या मातीच्या रस्त्यांना मोठ मोठे खड्डे पडलेले असून त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचते व त्या साचलेल्या पाण्याचा योग्य तो निचरा होत नसल्याने डासांची उत्पत्ती वाढून येथील नागरीकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात आले आहे. तरी कॉ. गोदुताई परुळेकर वसाहती अंतर्गत मुख्य रस्ते जवळपास ११ कि.मी. एवढ्या अंतराची असुन व मिनाक्षीताई साने सहकारी गृहनिर्माण वसाहती अंतर्गतचे मुख्य रस्ते ५ कि.मी. लांबीचे असुन या दोन्ही ठिकाणी वसाहती अंतर्गत मुख्य रस्ते करणे अत्यंत गरजेचे झालेले आहे.
तसेच ह्या वसाहतीस जोडणारे मुख्य रस्ते ग्रा.मा.क्र. 18 व 19 सन 2006 साली तयार करण्यात आले असून तेव्हापासून अद्यापपर्यंत रस्त्यांचे देखभाल दुरुस्ती न झाल्याने अत्यंत दुरावास्था झाली आहे. सदर रस्त्यांचा वापर नियमित असल्यामुळे तेथे दररोज किरकोळ व गंभीर अपघात होत असून काही नागरीकांना अपघातामध्ये आपला जीव देखील गमवावा लागला आहे व अनेकांना कायमचे अपंगत्व प्राप्त झाले आहे. ह्या रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता राज्य शासनाकडे पाठपुरावा केला मुख्य अंतर्गत रस्ते (अंदाजे 16 कि.मी.) बांधणीकरीता मा. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून विशेष बाब म्हणून मान्यता देऊन 9.75 कोटी रुपये निधी मलनिःसारण व्यवस्था करीता 70 कोटी रुपये निधी ची आवश्यकता आहे.याच बरोबर राज्य सरकार कडून वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी किमान 100 कोटी रुपयांचा निधी आणण्याची भिष्मप्रतिज्ञा यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर केला.
कॉ.गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था अ ब क संस्थेची रौप्य महोत्सवी वर्ष वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.
ते बोलताना पुढे म्हणाले की, आज विडी उद्योगावर संकट आले असून देशातील 65 लाख तर सोलापूर जिल्यातील किमान 60 हजार विडी कामगार बेचिराख होतील.कारण पूर्वी दर हजारी विड्यास सर्व कर मिळून 16 टक्के कर भरत असे पण आता 28 टक्के जी.एस. टी अधिक 1 रुपये 5 पैसे विक्रीकर असे सगळे मिळून 183 ते 200 कर भरावे लागत आहे. यामध्ये पश्चिम बंगाल मधून येणाऱ्या बनावट विड्याचा सुळसुळाट झालेला आहे.तसेच महाराष्ट्र राज्यात या बनावट विडी उत्पादनांचा शिरकाव झाला असून नियमित पणे कर भरणाऱ्या उद्योजकांना याचा थेट फटका बसत आहे. ते उद्योग सशक्तपणे चालविण्याची मानसिकता नाही. विडी उद्योग उध्वस्त होण्याचा धोका संभवत असून आणि यावर केंद्र किंवा राज्य सरकार गांभीर्याने कारवाई करायला तयार नाही.अधिकृत कारखानदार कडून मिळणाऱ्या सानुग्रह अनुदान, हक्क रजा, बाळंतपण रजा व लाभ, राज्य आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी , विडी कामगारांच्या पाल्यांना 1 ली ते पदव्युत्तर शिक्षणासाठी मिळणारी शैक्षणिक शिष्यवृत्ती तसेच सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत असे केंद्रात भाजप प्रणित मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून त्या सवलती बंद करून सरकारच्या दयेवर अवलंबून राहण्याची दयनीय अवस्था या सरकार ने जनतेवर आणली असल्याची टीका आडम मास्तर यांनी केली.
प्रास्ताविक युसुफ शेख (मेजर) यांनी केले.व्यासपीठावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ॲड.एम.एच.शेख,संस्थेचे चेअरमन फातिमा बेग,शकुंतला पाणीभाते,नसीमा शेख, विल्यम ससाणे,निलोफर शेख,अरिफा शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी बापू साबळे,विक्रम कलबुर्गी,रफिक काझी,हसन शेख,वसीम देशमुख,वसीम मुल्ला, अप्पाशा चांगले, तसेच सर्व संचालक मंडळ व अ,ब,क चे सर्व लढाऊ कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले.
वार्षिक लेखा परीक्षण अहवाल संस्थेचे व्यवस्थापक गजेंद्र दंडी यांनी मांडले व त्यास वार्षिक सर्वसाधारण सभेने एकमताने मंजूरी दिली.
सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक कॉ. विल्यम ससाणे यांनी केले.