मुंबई : राज्यभर गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात माजी वनमंत्री आणि आमदार संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात संजय राठोड यांचा समावेश होणार का असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता संजय राठोड यांचा नव्या सरकारच्या मंत्रिमंडळता समावेश होणार असल्याचे संकेत मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांची माहिती दिली. राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार हा आषाढी एकादशीनंतर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. याच दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप केला जातोय त्या संजय राठोड यांचा समावेश होणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे.