रत्नागिरी: प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या संचलनात सहभागी होण्याचा मान रत्नागिरीतील चिपळूणच्या विद्यार्थिनीला मिळाला आहे. दिशा पातकर असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. दिशा ही चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयात शिक्षण घेतेय. तिच्या निवडीने महाविद्यालयाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे.
दिशा डीबीजे महाविद्यालयात विज्ञान शाखेत तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच योगासने व कराटे यामध्ये तिने विशेष प्राविण्य मिळवले आहे. महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक भान, विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अंगभूत असलेल्या कला-कौशल्य या गुणांना प्रोत्साहन दिले जाते. यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन केले जाते. या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. याच मार्गदर्शनाचा उपयोग दिशालाही झालाय. कराटेमध्ये तिने ब्लॅक बेल्ट प्राप्त केला आहे. या सर्व कला जोपासल्याने मला यंदा राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातून २६ जानेवारी रोजी राजपथावर होणाऱ्या संचलनात सहभाही होण्याचा सन्मान मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया दिशा पातकरने दिली.