देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात : श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे आयोजन
सोलापूर : लेझीमचे बहारदार डाव, पारंपरिक मर्दानी खेळ अन् उत्साहपूर्ण हलगी पथकाच्या कडकडाटात श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गुरुवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणुक काढण्यात आली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
जेष्ठ शु. त्रयोदशी दिवशी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन यंदा ३५० वर्षे पूर्ण झाली. राज्याभिषेकानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज देवदर्शनासाठी बाहेर पडले होते. तीच परंपरा धारकऱ्यांकडून सुरू ठेवण्यासाठी श्री शिवराज्याभिषेक दिनादिवशी देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक काढण्यात येते.
प्रारंभी देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणुकीचे उद्घाटन ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात बाळासाहेब घाडगे आणि पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय साळुंखे यांच्या हस्ते पालखी पूजनाने करण्यात आले. यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला.
मिरवणुकीच्या अग्रभागी भगवा ध्वज होता. पांढरा शुभ्र गणवेश आणि वारकरी टोपी परिधान केलेल्या तरुणांनी ढोल – ताशांच्या गजरात जय भवानी, जय शिवरायचा जयघोष करीत अत्यंत उत्साहात लेझीमचे बहारदार डाव सादर केले. हे लेझीमचे डाव पाहण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. तसेच करकंब येथील प्रसिद्ध असलेल्या प्रतिबिंब सामाजिक व सांस्कृतिक मंचाच्या सदस्यांनी लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा अशी साहसी प्रात्यक्षिके सादर केले. या प्रात्यक्षिकांना सोलापूरकरांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. याशिवाय दोस्ती ग्रुपच्या हलगी पथकाने हलग्यांचा कडकडाट करीत वातावरणात जोश भरला.
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरापासून निघालेली देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सरस्वती चौक, मेकॅनिकी चौक मार्गे छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात विसर्जित झाली. या मार्गावर असलेल्या श्री सिद्धरामेश्वर मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री सरस्वती मंदिर, श्री दत्त मंदिर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन पालखी प्रदक्षिणा करण्यात आली.