हुबळी: ‘सरल वास्तू’चे संस्थापक चंद्रशेखर गुरुजींच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करा असे आदेश मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पोलिसांना दिले आहेत. आपण या संदर्भात हुबळी पोलीस आयुक्तांशी चर्चा करुन त्यांना निर्देश दिले आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. चंद्रशेखर गुरुजी यांची आज दोन अज्ञात व्यक्तींनी हुबळीतील एका हॉटेलमध्ये हत्या केली असून त्या संबंधित व्हिडीओ व्हायरल होत आहे.
चंद्रशेखर गुरुजींच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी पोलीसांनी या सर्व परिसरात नाकेबंदी केली आहे. हुबळीतील हॉटेलच्या लॉबीत दोन कथित अनुयायांनी चंद्रशेखर गुरुजी यांचे चरण स्पर्श केले. त्यानंतर त्यांनी गुरुजीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यानंतर हॉटेलमध्ये गोंधळ उडाला. या गोंधळातच हल्लेखोर पसार झाले. हॉटेलमधील व्हिडीओच्या फुटेजच्या माध्यमातून पोलीस तपास करत आहेत.