काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी : प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयघोषात निघाली मंगल अक्षता कलश मिरवणूक
सोलापूर : आपण सगळेजण प्रभू श्रीरामचंद्रांचे वंशज आहोत. त्यामुळे २२ जानेवारी हा श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाचा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करा, असे प्रतिपादन काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी यांनी केले. श्री रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र अयोध्या सोलापूर जिल्हा समितीच्यावतीने रविवारी अयोध्येहून आलेल्या मंगल अक्षता कलशाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांनी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात आशीर्वचन केले.
हरीभाई देवकरण प्रशालेसमोरून मंगल अक्षता कलश मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीचे उद्घाटन प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमा पूजनाने आणि भगव्या ध्वजाच्या पूजनाने करण्यात आले. मिरवणुकीच्या अग्रभागी भगवा ध्वज घेऊन भगवा फेटा परिधान केलेला युवक होता. यानंतर २३ मंगल अक्षता कलश घेऊन
दुर्गा वाहिनीच्या युवती सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकीत जय श्रीराम, भारतमाता की जय, वंदे मातरम अशा घोषणा तसेच प्रभू श्रीरामचंद्र छत्रपति श्री शिवाजी महाराज यांच्यावरील गीते म्हणण्यात येत होती.
ह. दे. प्रशालेपासून सुरुवात झालेली मंगल अक्षता कलशाची ही मिरवणूक मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट, होम मैदान, श्री सिद्धेश्वर हायस्कूलमार्गे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात दाखल झाली. या ठिकाणी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची पूजा करण्यात आली. तसेच मंगल अक्षता कलशांची पूजा
काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, विश्वस्त बाळासाहेब भोगडे, नगरसेवक शिवानंद पाटील उपस्थित होते.
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी, बालयोगी अविनाश महाराज सज्जन, श्री मुरारी महाराज, बौद्ध धर्माचार्य भंते सारी पुत्तजी, भंते नागबोधीजी, ह. भ. प. शाम महाराज जोशी, ह. भ. प. हरिप्रसाद धर्माधिकारी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. अभिमन्यू महाराज डोंगरे, ह. भ. प. अच्युत महाराज मोफरे, बसवराज शास्त्री हिरेमठ, ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जोशी, वेणुगोपाल जिल्ला पंतलु उपस्थित होते.
जगद्गुरु श्री श्री श्री डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी आशिर्वाचन करताना म्हणाले, य
आगामी २२ जानेवारी हा दिवस प्रत्येक हिंदूंसाठी भाग्याचा दिवस आहे. सर्वांना श्री अयोध्येला जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे प्रभू श्रीरामचंद्रांनीच आशीर्वादरुपी अक्षता आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. प्रत्येक हिंदूंच्या घरात या अक्षता आणि प्रभू श्रीरामाची प्रतिमा मिळणार आहे. त्यादिवशी सर्व हिंदू बांधवांनी दिवाळीप्रमाणे दिवे लावून गोडधोड करून दिवस साजरा करावा. याप्रसंगी बहुसंख्य हिंदू बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. वेणुगोपाल जिल्ला पंतलु यांनी पौरोहित्य केले. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. अभिमन्यू महाराज डोंगरे आणि विश्व हिंदू परिषदेचे विशेष संपर्क प्रमुख ह. भ. प. शाम महाराज जोशी यांनी मंगल अक्षता अभियानाची आणि कारसेवेची माहिती दिली. श्री रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र अयोध्या सोलापूर जिल्हा समितीचे सहप्रमुख विजयकुमार पिसे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह ऋषीकेश कुलकर्णी, शहर शिवानंद कल्लुरकर, विभाग प्रचारक मंगेश बडवे, संतोष कुलकर्णी, रंगनाथ बंकापूर, गंगाधर गवसने, संजीव सिद्धुल, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संजय जमादार, सहमंत्री अशोक पुजारी, शहराध्यक्ष जयदेव सुरवसे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक दीपक मुत्ता, शहर मंत्री बाबू गिरगल, शहर संयोजक नागेश बंडी, जिल्हा सहसंयोजक रवी बोल्ली, सहमंत्री रवी नामदास आदी उपस्थित होते.
श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीतर्फे ५१ हजारांची देणगी
श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीतर्फे श्री अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरास ५१ हजारांच्या देणगीचा धनादेश श्री रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र अयोध्या सोलापूर जिल्हा समितीकडे सुपूर्द केला.