विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजाचे दर्जेदार प्रशिक्षण द्यावे
सोलापूर, दिनांक 8(जिमाका):- 1 जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एक ही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपायुक्त पुनम मेहता अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, मनपा उप आयुक्त मच्छिंद्र घोलप, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मतदार यादी निरीक्षक डॉ. पुलकुंडवार पुढे म्हणाले की, निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्वपुर्ण असते, यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) राबविला आहे.
दि.6 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुर्ररिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मतदार यादी मध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही व एकही पात्र मतदार येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानापासून वंचित राहणार नाही याची खात्री मतदान अधिकारी यांनी करून घ्यावी, असे त्यांनी सुचित केले.
प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खत्री करणे आवश्यक आहे. कारण, बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नांव मतदार यादीमध्ये नाही अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. तसेच आपले नाव, पत्ता, लिंग, जन्म दिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशिल सुध्दा अचुक आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना सदर तपशिलामध्ये दुरूस्त्या करावयाच्या असतील त्यांनी अर्ज क्रमांक 8 भरावा. विशेष संक्षिप्त पुर्रनिक्षण कार्यकमांतर्गत एखाद्या मतदारासंघातील एखादा मतदार, यादीत दिलेल्या पत्यावर राहात नसेल, तर अशा नावा बद्दल त्याच मतदारसंघातील एखदा मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्यावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची नावे वगळताना मतदार अधिकारी यांनी योग्य खबरदारी घ्यावी असे निर्देश डॉ. पुलकुंडवार यांनी दिले.
विधानसभा निवडणुका 2024 च्या अनुषंगाने सर्व उपविभागीय अधिकारी हे त्या त्या विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत तर तहसीलदार हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील त्यामुळे सर्व प्रशिक्षण अत्यंत व्यवस्थितपणे घ्यावे तसेच आपल्या अंतर्गत येणाऱ्या झोनल ऑफिसर व प्रिसायडिंग ऑफिसर यांना अत्यंत उत्कृष्ट प्रशिक्षण मिळेल याची व्यवस्था करावी. निवडणुकीत समाविष्ट होणारा प्रत्येक अधिकारी कर्मचारी याला नेमणूक कामकाजाचे व त्याला दिलेल्या जबाबदारीचे सर्व प्रशिक्षण व्यवस्थित होईल याकरता अत्यंत तज्ञ प्रशिक्षक नियुक्त करावेत असेही डॉ. पुलकुंडवार यांनी सुचित केले.
मतदार स्लिप प्रत्येक मतदारापर्यंत विहित कालावधीत वितरित होईल यासाठी सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी योग्य नियोजन करावे या प्रक्रियेवर उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी नियंत्रण ठेवावे. निवडणूक कर्मचारी व सर्वसामान्य मतदारांना सॅम्पल मशीनद्वारे मतदान करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात यावे, असेही निर्देश डॉ. पुलकुंडवार यांनी दिले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पीपीटी द्वारे मतदार नोंदणी, दुरूस्ती व वगळणी यासाठी दि.10 व 11 ऑगस्ट 2024 व दि.17 व 18 ऑगस्ट 2024 या दिवशी विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम राबविला जाणार असून या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर BLO मतदार यादीसह उपस्थित राहतील, तसेच दि.23 जानेवारी 2024 च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकुण मतदार 35 लाख 78 हजार 972 इतकी होती, तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, 36 लाख 56 हजार 833 इतकी होती. आज दि.6 ऑगस्ट 2024 रोजी सदर मतदार संख्या ही 36 लाख 92 हजार 409 इतकी असून यामध्ये पुरूष- 19 लाख 8 हजार 146, महिला-17 लाख 83 हजार 966 व इतर 297 मतदारांचा समावेश आहे. यामध्ये लोकसभेच्या तुलनेत 35 हजार 576 इतक्या मतदारांची वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये एकूण 3617 मतदान केंद्र होती. यामध्ये मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण करून 124 मतदान केंद्राची नव्याने वाढ होऊन मतदान केंद्राची संख्या 3723 झालेली आहे. एकूण 3723 मतदान केंद्रापैकी शहरी- 1177 व ग्रामीण भागामध्ये -2546 मतदान केंद्राचा समावेश आहे. तसेच नागरिकांनी आपली नावे विशेष पुर्ररिक्षण कार्यक्रम दि.6 ऑगस्ट 2024 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत नोंदवून घेण्यात यावीत तसेच तद्नंतर सदर मतदार नोंदणी प्रक्रिया ही निरंतर सुरू राहणार आहे. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मतदारांनी- voters.eci.gov.in आपली नावे मतदार यादमध्ये शोधणेसाठी ceo.maharashtra.gov.in संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन ही जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आल्याची माहिती श्री आशीर्वाद यांनी दिली.
राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी मतदार स्लीप वेळेत तसेच शंभर टक्के मतदारापर्यंत पोहोचली पाहिजे याची खात्री निवडणूक प्रशासनाने करावी. मतदार यादि साठी राजकीय पक्षाकडून पैसे घेऊ नयेत. वोटर सर्च ॲप अद्यावत ठेवावे. मतदार नोंदणी प्रक्रियेत बीएलओ मतदार केंद्राच्या ठिकाणी उपस्थित नसतात तसेच ते राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीत तरी त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी असे सूचना मांडून मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून अद्यावत मतदारांच्या याद्या राजकीय पक्षांना उपलब्ध करून द्याव्यात. बदललेले मतदान केंद्रे तसेच नव्याने निर्माण झालेले मतदान केंद्राची सविस्तर माहिती राजकीय पक्षांना उपलब्ध करून द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या.
महसूल पंधरवडा-
निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिनांक 1 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या महसूल पंधरवाडा अंतर्गत आज रोजी पर्यंत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांच्यासमोर सादर केली. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आधीची माहिती बैठकीत सादर करण्यात आली.
*स्वच्छ कार्यालय सुंदर कार्यालय-
महसूल पंधरवडा अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नगरपालिका प्रशासन कार्यालयाने स्वच्छ कार्यालय सुंदर कार्यालय अंतर्गत केलेल्या कामाची माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी विना पवार यांनी सादर केली.
नियोजन भवन परिसरात वृक्षारोपण-
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते नियोजन भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह व निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी ही वृक्षारोपण केले. यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे आदी उपस्थित होते.