येस न्युज नेटवर्क : कर्नाटकातून महाराष्ट्रात बससेवा पुन्हा सुरु झाली आहे. बेळगावहून कर्नाटक सरकारची बस पुण्याला रवाना झाली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यातील बससेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. अखेर आज कर्नाटक सरकारची बेळगाव-पुणे ही बस रवाना झाली आहे. ही बस बेळगावहून निघाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर शहरात जाणार नाही. कोल्हापूर बायपासमार्गे पुढे सातारा आणि मग पुण्याकडे रवाना होणार आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांनी बस सेवा बंद केल्याने दररोज ये जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.
कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यावर आपला दावा सांगितल्याने त्याला महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं. तेव्हापासून दोन्ही राज्यातील वातावरण तापलं आहे. यानंतर कर्नाटकच्या बसला दौंड इथे शाई फासण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राच्या बसला कलबुर्गी इथे काळे फासण्यात आले. या साऱ्यांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा बंद केली होती. कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांनी बस सेवा बंद केल्याने नोकरी, उद्योगाच्या निमित्ताने कर्नाटक आणि महाराष्ट्रात दररोज ये जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. अखेर आज बेळगावहून पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.