सोलापूर : सोलापुरातील खरेदी विक्री कार्यालयात दररोज दस्त नोंदणीच्या वेळी प्रतिदस्त 5000 ते 10 हजार रुपये अशी लाच घेतली जात आहे. किरकोळ कारणावरून पक्षकाराला त्रास दिला जातो. त्यामुळे या ठिकाणी लाच दिल्याशिवाय खरेदी-विक्री केली जात नाही. सोलापूर शहरात सह दुय्यम उपनिबंधक कार्यालय क्रमांक एक, दोन आणि तीन या ठिकाणी अनुक्रमे शेख, खडतरे आणि कडू हे कार्यरत आहेत. या कार्यालयाच्या बाहेर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना बसण्याची सोय नाही. स्वच्छतागृहांची दुरावस्था आहे तसेच परिसरात दुर्गंधी आहे. असे असताना या मूलभूत बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यातील खडतरे वर्षानुवर्ष सोलापूर जिल्ह्यातच ठाण मांडून बसले आहेत. आपण किरकोळ दस्त करत नाही आणि दर शनिवार, रविवार या सुट्टीदिवशी आपण फोर, सिक्स मारत असतो अशी कामाची शैली त्यांची आहे.
नियमानुसार जे पहिल्यांदा आलेत त्यांची दस्त नोंदणी प्रथम होणे गरजेचे असताना पाच हजार तसेच दहा हजार रुपये घेऊन जे पाठीमागून आले त्यांचा वशिल्यावर दस्त नोंदणी करण्यात खडतरे पटाईत आहेत. इथल्या भ्रष्टाचार बाबत मुद्रांक जिल्हाधिकारी जी. डी. गीते यांना कल्पना दिली तरीही ते दुर्लक्ष करतात. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जी दुय्यमसह उपनिबंधकाची कार्यालय आहे ती भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहेत. या कार्यालयातून लाखो रुपये वसूल करून आम्हाला वरिष्ठांना द्यावे लागतात असे इथले गड्याचे गवंडी झालेले अधिकारी सांगतात. अधून मधून विना लेआउट चे तसेच अपुरी कागदपत्र असलेले दस्त नोंद करून लाखो रुपये कमी केले जातात. आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीच या कार्यालयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वर्षभरात सुमारे साडेचारशे ते पाचशे कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्क च्या माध्यमातून शासनाकडे जमा होतो. सुमारे लाखभर दस्त नोंदविले जातात असे असले तरीही वरिष्ठांचा हलगर्जीपणा आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांना जोपासणे यामुळे इथला भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढू लागला आहे हे दुर्दैव.