सोलापूर : ‘देहदान हेच श्रेष्ठदान’ असे जनजागृती करणारे वाक्य आपल्या अनेक वेळा वाचनात येतात. मात्र, हा संकल्प करताना कुठली प्रक्रिया अवलंबली जाते, याची फारशी माहिती इच्छुकांना मिळत नाही. मरणोत्तर देहदानासाठी संबंधित संस्था किंवा मेडिकल कॉलेजच्या विनंती अर्जानंतर स्वेच्छापत्र तयार होते आणि ही प्रक्रिया सुरू होते.मेडिकल कॉलेजमध्ये देहदान समिती स्थापन करण्यात आली आहे. इच्छापत्र भरून दिल्यावर या विभागाव्दारे नोंदणीपत्र व क्रमांक, संबंधित डॉक्टर्सचे टेलिफोन नंबर, आयबँक आदींची माहितीही दिली जाते. अर्थातच सर्व वारस आणि नातेवाइकांच्या संमतीनेच हे स्वेच्छापत्र भरले जाते. मरणोत्तर देहदान प्रक्रिया मृत्यू पश्चात सहा तासांत होणे आवश्यक असते.
“अभ्यासासाठी पार्थिवाचा अनेक महिने उपयोग व्हावा म्हणून मेडिकलमध्ये फॉर्मेलीन इंजेक्शन प्रक्रिया केली जाते. तसेच फक्त नैसर्गिक मृत्यू झाल्यास देहदान करता येत. एड्स, सार्स, कावीळ, नुकतेच ऑपरेशन झालेले मृत शरीर, अनेक वर्ष अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तीचे शरीर यासाठी चालत नाही.जिवंतपणी करता येणारे आणि मृत्युपश्चात केले जाणारे असे दोन प्रकारचे अवयवदान असते. ब्रेनडेड पेशंटच्या अवयवांचेही दान होते. जिवंतपणी करता येणारे रक्त, त्वचा, यकृत व अस्थीमज्जेचा काही भाग, दोन मूत्रपिंडांपैकी एका मूत्रपिंडाचे दान आदी केले जाते. मृत्यूनंतर नेत्रदान व त्वचादान केले जाते. ब्रेन डेड म्हणून घोषित केल्यानंतर नेत्र, त्वचा, अस्थी, अस्थिमज्जा, रक्तवाहिन्या, हृदय, फुप्फुस, यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड यांचे दान होऊ शकते.कोमातून पेशंट बाहेर येऊ शकतो. कोमात गेलेल्या पेशंटचे अवयव प्रत्यारोपणासाठी घेतले जात नाहीत. मृत्यूनंतर दोन ते चार तासांमध्ये नेत्रदान होणे आवश्यक असते. नेत्रदात्याच्या मृत्यूनंतर त्वरित जवळच्या नेत्रपेढीला कळविणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी नेत्रदानाचे प्रतिज्ञापत्र भरले नसले तरीही वारसदार व्यक्ती मृत व्यक्तीचे नेत्रदान करू शकतात.”अधिक माहितीसाठी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथील शरीररचनाशास्त्र विभागातील डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आहवन करण्यात आले आहे…
“१९८२ सालापासून मी ७५० इच्छुक देहदात्यांचे स्वेच्छापत्र तयार केले आहेत. त्यापैकी आजवर २५० पार्थिव मेडिकल कॉलेजला दान करण्यात आले आहेत. मृत्यूनंतर नातेवाइकांनी शासकीय देहदान समितीच्या सदस्यांशी संपर्क साधावा. इच्छुकाचा बाहेरगावी मृत्यू झाल्यास तेथील वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा देहदानाची प्रक्रिया करता येते.”
डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता,
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर.