इंदूर : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान इंदूरच्या एका पोलीस ठाण्यात पशु क्रूरतेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
जन आशीर्वाद यात्रेत एका घोड्याच्या शरीरावर भाजपच्या झेंड्याचा रंग फासण्यात आला होता. हा घोडा छावनी परिसरातील एका स्वागत द्वाराजवळ उभा करण्यात आला होता. भाजपचे माजी नगरसेवक रामदास गर्ग यांच्या मागणीनंतर हा घोडा इथं आणल्याचं सांगितले जाते आहे .
मात्र, घोड्याच्या शरीरावर फासलेल्या रंगानं प्राणी प्रेमींना क्रोधीत केले आहे . भाजपने आता पशुंनाही सोडले नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे .
जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केसरी-हिरव्या रंगात रंगलेला हा घोडा अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. घोड्याच्या पाठीवर एक कमळाचं फुलही रेखाटण्यात आले होत. तसंच घोड्याच्या शरीराचा पुढचा भाग भगव्या आणि मागचा भाग हिरव्या रंगात रंगवण्यात आला होता. या प्रकाराला ‘पीपल्स फॉर अनीमल’ या संघटनेकडून जोरदार विरोध दर्शवण्यात आलाय. संस्थेच्या स्थानिक सदस्यांनी हे ‘प्राण्यांप्रती क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० चे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे . सोबतच, हा प्रकार करणाऱ्या यात्रा संचालकांविरोधात संयोगितागंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे .