नूतन शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची गर्जना : शहर भाजपतर्फे झाला सत्कार
सोलापूर : अडचणी अनेक आहेत. परंतु त्यासर्वांवर मात करून भाजपच्या वरिष्ठ आणि कार्यकर्त्यांच्या सहयोगातून सोलापूर शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून येतील अशी गर्जना भारतीय जनता पार्टीचे नूतन शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केली. भाजपाच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहर भाजपतर्फे नरेंद्र काळे यांचा सत्कार शनिवारी शांतीसागर मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीत करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे होते. याप्रसंगी व्यासपीठावर खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, माजी महापौर किशोर देशपांडे, भाजपचे माजी शहर अध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी आमदार नरसिंग मेंगजी, प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे उपस्थित होते. प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर नूतन शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचा जंगी सत्कार झाला.
नूतन शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले,
भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता हे सगळ्यात मोठे पद आहे. पक्षासाठी पर्यायाने राष्ट्रासाठी निस्वार्थपणे काम करणारा कार्यकर्ता घडवणे हेच आपल्या सर्वांचे ध्येय असले पाहिजे. आगामी महानगरपालिका विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व जागांवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निवडून येण्यासाठी सामूहिक प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळणार आहे, असे श्री. काळे म्हणाले.
भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी अनेकदा लाठ्या खाल्ल्या, रक्त सांडले, जीवाचे रान केले. त्याचे फळ म्हणून संपूर्ण देशात आज भाजपची सत्ता दिसत आहे. मला कोणताही राजकीय वारसा नसताना माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्याला पक्षाने मानाचे स्थान दिले आहे. आगामी काळात पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचेही शहराध्यक्ष नरेंद्र काळे यावेळी म्हणाले.
माजी मंत्री दिलीप कांबळे म्हणाले, भाजपाची घोडदौड संपूर्ण देशभरात सुरू आहे. आगामी काळातही भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहणार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभेची जागा मागीलपेक्षा दुप्पट मतांनी जिंकू, असा विश्वासही माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी नवनियुक्त शहर उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील आणि दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख श्रीकांचना यन्नम यांचा सत्कार करण्यात आला.
भाजपाचे सोलापूर लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांनी प्रास्ताविक तर प्रा. नारायण बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संजय कोळी माजी सभागृह नेता संजय कोळी, शहर उत्तर विधानसभा निवडणुक प्रमुख राजकुमार पाटील, प्रसाद कुलकर्णी देविदास चेळेकर, परिवहन समितीचे माजी सभापती जय साळुंके, भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष गणेश साखरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा इंदिरा कुडक्याल, श्रीकांत घाडगे, राम वाकसे, विनोद मोटे, श्रीरंग गवई, समीर देशपांडे, सतिश महाले, प्रेम भोगडे आदी उपस्थित होते.