देशातील 9 विरोधी पक्षांच्या नेत्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना महत्त्वाचं पत्र. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा पत्रातून आरोप.
देशातील 9 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला आहे. राज्यपालांमुळे केंद्र आणि राज्यातही तणाव वाढल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई करुन भाजप सोडून इतर राजकीय पक्ष सातत्यानं गोत्यात आणले असल्याचा आरोप पत्रातून केला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सीबीआय आणि ईडीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. या कारवाईमुळे तपास यंत्रणेच्या विश्वासार्हतेला तडा जात असल्याचंही विरोधकांनी म्हटलं आहे.
9 विरोधी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. पत्रात विरोधकांनी भाजपवर सीबीआय आणि ईडीसारख्या एजन्सीचा गैरवापर करत असल्याची टीका केली आहे. पत्रात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधातील तपास संथ गतीनं सुरू असल्याचंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
पत्रात राज्यपालांमुळे केंद्र आणि राज्यांमध्ये तेढ वाढत असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे केंद्रीय यंत्रणांची प्रतिमा मलीन होत असल्याचा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी याबाबत चिंताही व्यक्त केली आहे
पत्रात पुढे म्हटलं आहे की, 26 फेब्रुवारीला दीर्घ चौकशीनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयनं अटक केली आहे. त्याला अटक करताना त्याच्याविरुद्ध कोणताही पुरावा दाखवण्यात आलेला नाही. 2014 पासून ज्या नेत्यांवर कारवाई झाली, त्यापैकी बहुतांश नेते विरोधी पक्षातील आहेत.
‘या’ 9 विरोधी पक्षनेत्यांनी लिहिलंय पत्र :
बंगालच्या मुख्यमंत्री आणि TMC प्रमुख ममता बनर्जी
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि AAP प्रमुख अरविंद केजरीवाल
पंजाबचे मुख्यमंत्री आणि AAP नेते भगवंत मान
तेलंगानाचे मुख्यमंत्री आणि BRS प्रमुख के. चंद्रशेखर राव
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख अखिलेश यादव
बिहारचे उपमुख्यमंत्री आणि RJD नेते तेजस्वी यादव
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला