अक्कलकोट, दिनांक 30 मार्च 2024 : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील चपळगाव जिल्हा परिषद गटात दहीटणेवाडी, चपळगाववाडी, चपळगाव, बुराणपूर, डोंबरजवळगे, बोरेगाव, दर्शनाळ, अरळी, नन्हेगाव, पितापुर, सह इतर गावांना गावभेटी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकारकने जाती धर्मातील कटुता आणण्याचे कारस्थान, खोटी आश्वासने, विकासाच्या भुलथापा मारून जनतेची फसवणूक केली आहे. गेल्या दहा वर्षात एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. तसेच विधानसभा असो अथवा लोकसभा या ठिकाणी सत्ताधारी आमदार खासदारांनी जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्नच केला नसल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.
लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसला मत द्या; सिद्धराम म्हेत्रे यांचे आवाहन
भाजपकडून लोकशाहीचा घात करून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. संविधान बदलण्याची भाषा भाजपकडून केली जात आहे. त्यामुळे यावेळी प्रत्येकाने लोकशाही वाचवण्यासाठी विचारपूर्वक मतदान करणे गरजेचे आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी अक्कलकोट येथील डोंबर जवळगे येथे केले.
महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे या अक्कलकोट तालुक्यातील गाव भेटी दौऱ्यावर आहेत, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी सिद्धाराम आमदार प्रणितीताई शिंदे, यांच्यासह प्रथमेश म्हेत्रे, शितलताई म्हेत्रे, मल्लिकार्जुन पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा मिस्त्री, अशफाक बलोरगी, शिवसेना अध्यक्ष आनंद बुक्कानुरे, राष्ट्रवादी अध्यक्ष बंदेनवाज कोरबु, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष माया जाधव, व्यंकट मोरे, मनोज यलगुलवार, काशिनाथ कुंभार, सुरेखा पाटील, विश्वनाथ भरमशेट्टी, सिद्धार्थ गायकवाड, प्रवीण शटगार, सोमनाथ चिकलंडे, तिरुपती परकीपंडला, समाधान व्हटकर आधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
म्हेत्रे पुढे म्हणाले की, यावेळी आपल्याला फार दक्ष राहून मतदान करावे लागेल. चपळगाव, डोंबर जवळगे, चुंगी या भागाचा विकास कुरनूर धरणामुळे झाला आणि हे धरण सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून झाले. याचबरोबर धरण क्षेत्रातील नागरिकांचा धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न देखील सुशीलकुमार शिंदे यांनी मार्गी लावला. यामुळे आज हा परिसर आपल्याला सुजलाम सुफलाम दिसून येत आहे. या धरणामुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.
मतदारसंघात आपला माणूस असला तर तो आपली काळजी करतो. मात्र गेल्या दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी काय काम केले? आपल्या भागाचा काय विकास झाला? असा सवाल करत, म्हेत्रे यांनी भाजपवर निशाणा साधला. दरम्यान, आमदार प्रणिती शंदे यांचे आमदार म्हणून काम चांगले आहे. त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्या एकमेव विरोधी पक्षाच्या आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी केवळ शहर मध्यच नाही तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रश्न विधानसभेत मांडले. लोकांच्या समस्यांवर आवाज उठवला. त्याचप्रमाणं संसदेतदेखील आपले प्रश्न मांडण्याची धमक, अभ्यास करण्याची वृत्ती असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मतदान करून आपल्या या सोलापूरच्या लेकीला लोकसभेत पाठवण्याचे आवाहन केले.