बालाजी अमाईन्स लिमिटेडला नारायण मेघाजी लोखंडे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येतो.
सदर पुरस्कार आकाश फुंडकर, महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड सेंटर येथे ११ एप्रिल २०२६ रोजी आयोजित प्रतिष्ठित समारंभात प्रदान करण्यात आला. कंपनीच्या वतीने जनरल मॅनेजर आर. एस. शास्त्री, सहा. व्यवस्थापक एच. आर.- एम. आर. सावंत व सेफ्टी ऑफिसर प्रशांत तारमोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
हा पुरस्कार राज्यातील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योगांना दिला जातो. औद्योगिक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन, कार्यस्थळी अपघात टाळणे आणि कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे.१९८८ साली स्थापन झालेल्या बालाजी अमाईन्स लिमिटेडने धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी येथे एकाच उत्पादन प्रकल्पापासून आपल्या कार्याची सुरुवात केली. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे अलिफॅटिक अमाइन्सचे उत्पादन करून कंपनीने गेल्या तीन दशकांत जागतिक स्तरावर एक विश्वासार्ह उत्पादक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
सध्या कंपनी महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांमध्ये चार उत्पादन युनिट्स कार्यरत असून, ५० हून अधिक देशांमध्ये निर्यात करते. तसेच देशात प्रथमच अनेक आयात-पर्यायी उत्पादने विकसित करण्याचा मान कंपनीला मिळाला आहे.याबाबत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी म्हणाले, “आम्ही सुरक्षेला खूप महत्त्व देतो आणि पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा यांवर सातत्याने भर देतो. आमची बांधिलकी केवळ कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नसून समाजापर्यंत विस्तारलेली आहे. हा पुरस्कार आमच्या सुरक्षा उपक्रमांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल आहे.”

