भंडारकवठे-माळकवठे-औज रस्त्याचे भूमिपूजन
सोलापूर : औज गावातील सेवानिवृत्त शिक्षक, अधिकारी आणि कर्मचार्यांनी गावाचा विकास करण्याचा वसा घेतला आहे. त्यांना गावातील इतर लोकांनी साथ द्यावी, सर्वांनी निवडणुकीपुरते राजकारण करावे, इतरवेळी गावाच्या विकासासाठी एकत्र यावे. असे झाल्यास आगामी काळात औज हे गाव महाराष्ट्रातील मॉडेल गाव म्हणून ओळखले जाईल, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
अर्थसंकल्प आणि जिल्हा व इतर मार्ग योजनेतून भंडारकवठे- माळकवठे- औज (मं.) या दीड कोटी रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम औज येथे शुक्रवारी पार पडला, त्याच्या उद्घाटनप्रसंगी आ. देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिणच्या सभापती सोनाली कडते यांची उपस्थिती होती.
आ. देशमुख म्हणाले, आज या तालुक्याने आपल्याला निवडून दिले आहे. त्यामुळे तालुका, गावातील प्रत्येक घटक सक्षम कसा होईल, यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. यासाठी सर्वांची साथ आवश्यक आहे. प्रत्येक गावाने एकमेकाचे उणे-दुणे न काढता विकासाची स्पर्धा करावी. औज गावात सर्वात जास्त शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आहेत. सर्व सेवानिवृत्त कर्मचार्यांनी या गावाचा विकास करण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. असाच प्रयत्न सर्व गावांनी करावा. या कार्यक्रमाला जि.प.चे पक्षनेते अण्णाराव बाराचारे, जि.प. सदस्या प्रभावती पाटील, उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी, पं.स. सदस्य संदीप टेळे, महादेव कमळे, शशिकांत दुपारगुडे, ताराबाई पाटील, रेखा नवगिरे, रकमाबाई चन्ने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
चौकट
राज्य सरकारकडून सहकार्य नाही
गेल्या वर्षी दक्षिण तालुक्यात आपल्या आमदार निधीपेक्षा मुख्यमंत्री सहाय्यता निधी जास्त मिळाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे सहकार्य लाभले. मात्र आता कोरोना काळात अनेक लोक आजारी पडले. आपल्याकडे त्यांनी व्यथा मांडल्यावर मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे अनेकदा मागणी केली. मात्र आतापर्यंत एकदाही निधी आला नाही, असे म्हणत राज्य सरकार सहकार्य करत नसल्याचे आ. देशमुख म्हणाले.