सोलापूर : शहरातील खाजगी शाळा ही फीसाठी अजूनही मनमानी करीत असल्याचा दावा आम आदमी पालक संघटनेचे अध्यक्ष रॉबर्ट गौडर यांनी केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीय पालकांचे हाल झाले आहेत. बरेच पालक हे हातावरचे पोट असणारे आणि छोटे व्यावसायिक असल्याने खासगी शाळांनी फी मध्ये 50 टक्के सवलत द्यावी, अशी मागणी एडवोकेट शर्वरी रानडे आणि एडवोकेट अश्विनी कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केली. संगमेश्वर पब्लिक स्कूलने सिद्धराज कुलकर्णी या विद्यार्थ्याचे आणि केएलई स्कूलने चेतन सरवाडकर या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबवल्याचे या वेळी पालकांनी सांगितले. शांती इंग्लिश स्कूल आणि महेश प्राथमिक इंग्लिश मीडियम स्कूल या खाजगी शाळांमध्ये फी बाबत पालकांना तगादा लावण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. सर्वच खासगी शाळा शासनाच्या नियमाविरुद्ध वागत आहेत. आणि त्यांनी पालकांना तुम्हाला काय करायचे ते करा, कोणाकडे जायचे तिथे जा, आमचे कोणी वाकडे करू शकत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत.