मुंबई : जिल्हा नियोजन समितीकडे सन 2025-26 साठी सादर करण्यात आलेल्या विविध विकासकामांना तात्काळ मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग, एमएसईबी डीपी, जनसुविधा व नागरी सुविधा अंतर्गत कामे, दलित वस्तीतील विकासकामे, जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती व नवीन वर्गखोल्या बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती, महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हास्तर नगरोन्नती योजना, तसेच शहरी अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधारणा योजनेतील विविध कामांचा या प्रस्तावात समावेश आहे.
मात्र, या महत्त्वाच्या कामांना अद्याप मंजुरी व निधी मिळालेला नसल्याने विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन संबंधित कामांना तात्काळ मान्यता देऊन निधी वितरित करावा, अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत खासदार प्रणिती शिंदे यांनी सादर केलेल्या यादीतील कामांना मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रणिती शिंदे यांना दिले

