मुंबई : हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडालेली असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी प्रदीप कुरुलकर यांच्यासह अन्य एक अधिकारी देखील हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा संशय एटीएसला असल्याचे समोर आले आहे.
डीआरडीएचे संचालक प्रदीप कुरुलकर यांनी अग्नी, ब्रम्होस, क्षेपणास्त्रविरोधी मिसाइलची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. यानंतर आता ते ज्या महिलेच्या संपर्कात होते, त्याच महिलेच्या संपर्कात अन्य एक अधिकारी असल्याचे एटीएसच्या तपासातून समोर आले आहे. त्यामुळे हा अधिकारी देखील हनी ट्रॅप प्रकरणात अडकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यानंतर एटीएसने या अधिकाऱ्याला देखील ताब्यात घेतले असून त्याच्याकडे साक्षीदार म्हणून एटीएस पाहत आहे.
एटीएसने न्यायालयात सांगितले की, जेव्हा ते डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्या कॉल आणि डेटा तपशीलांची छानणी करत होते तेव्हा त्यांना या गुप्तचर विभागात काम करणाऱ्या अन्य अधिकाऱ्याचा नंबर सापडला. त्यानंतर या दुसऱ्या अधिकाऱ्याने महिलेसोबत कोणतीही गोपनीय माहिती शेअर केली आहे की नाही यावर एटीएसची पुढील कारवाई अवलंबून असेल.