मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळाला नसून त्यांचा जामीन अर्ज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे अनिल देशमुखांची यंदाची दिवाळी तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अनिल देशमुख यांना जामीन मिळाला होता. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यावरुनच सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याने या प्रकरणातही जामीन मिळावा अशी याचिका अनिल देशमुख यांच्या वतीनं करण्यात आली होती. याच जामीन अर्जावर सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू होती. आज न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने देशमुखांची यंदाची दिवाळी तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने अनिल देशमुख यांना मोठा झटका बसला आहे. अनिल देशमुख यांच्यावर मनी लॉंड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईडीच्या प्रकरणात जामीन अर्ज मिळाल्यानंतर सीबीआयच्या प्रकरणातही त्यांना जामीन मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, पण न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही. सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर अनिल देशमुखांच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात येणार आहे.