सोलापूर – आनंद शिंदे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अरुण प्रभाकर रोडगे, रा:- सोलापूर यांस प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री.मनोज शर्मा यांनी अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या हकीकत अशी की,मयत आनंद हा त्याच्या कुटुंबीयांसमवेत दमानी नगर येथे राहत होता व तो जागेच्या देवाण घेवाणीचा व्यवसाय करीत होता. मयत आनंद व सकलेस जाधव यांचेत सात रस्ता येथे भांडण झाले होते, त्यावेळी सकलेस याने मयत आनंद यांस मारहाण केली होती, त्याबाबत सदर बझार पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.
तसेच सुमारे सहा महिन्यापूर्वी अरुण रोडगे व मयत आनंद यांच्यात भांडण झाले होते तेव्हा अरुण रोडगे यांनी मयतास मारहाण केली होती. त्यानंतर सकलेस जाधव व अरुण रोडगे हे दोघे मयत आनंद यास त्रास देत होते. असे मयताने त्याच्या आईस सांगितले होते.
दिनांक 14/7/2025 मयत आनंद हा त्याची मावशी शहाबाई जगताप हिचे कडे गेला होता. तेव्हापासून तो मावशीकडेच होता. दिनांक 15/7/2025 रोजी मयताची मावशी ही स्वयंपाकासाठी बाहेर गेली होती, त्यावेळी आनंद हा घरी एकटाच होता. दुपारी सव्वा एक वाजता मावशी कामावरून घरी आली त्यावेळेस आनंद हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
त्यावेळी त्याच्या हातात दोन चिठ्ठ्या मिळून आल्या,”मी असा नव्हतो, माझी इच्छा न्हवती फाशी घ्यायची मला घ्यायला भाग पाडले, माझा मोबाईल हॅक करून निराश केले – अरुण रोडगे,” व दुसऱ्या चिठ्ठी मध्ये, “सकलेस जाधव,” व सही असे लिहिलेले होते.
त्यावरून मयताची आई अंजना दादाराव शिंदे हिने दिनांक 15/7/2025 रोजी सकलेस जाधव व अरुण रोडगे यांच्या त्रासाला कंटाळून मुलगा आनंद याने आत्महत्या केली आहे, अशा आशयाची फिर्याद सलगर वस्ती पोलीस ठाण्यात दिली होती.
आपणास अटक होऊ नये म्हणून अरुण रोडगे यांनी ॲड मिलिंद थोबडे यांचेमार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲड.मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात, फिर्यादीचे अवलोकन केले असता, सकृतदर्शनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे दिसून येत नसल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी 25,000/- रुपयाच्या जातमुचलक्यावर पाच दिवस पोलिस ठाण्यात हजेरी देण्याच्या अटीवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात अर्जदार आरोपीतर्फे ॲड.मिलिंद थोबडे, ॲड.दत्ता गुंड यांनी काम पाहिले.